अकोला : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अकोला मार्गे धावणाऱ्या मुंबई-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष व पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष गाड्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात या दोन्ही रेल्वे गाड्यांच्या अप व डाऊन मार्गावर एकूण ९० फेऱ्या होणार असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे.
मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, १५फेब्रुवारीपर्यंत अधिसूचीत असलेली गाडी क्र. ०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर द्वि-साप्ताहिक विशेषला आता ३० मे २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत या गाडीच्या ३० फेऱ्या होणार आहेत. १७ फेब्रुवारीपर्यंत अधिसूचीत असलेली गाडी क्र. ०२१४० नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष आता १ जून २०२४ पर्यंत धावणार असून, या गाडीच्या ३० फेऱ्या होतील. या गाड्यांची वेळ, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पुणे-नागपूर-पुणे एक्स्प्रेसच्या ३० फेऱ्या
पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसच्या एकूण ३० फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. १५फेब्रुवारीपर्यंत अधिसूचीत असलेली गाडी क्र. ०२१४४ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष आता ३० मे २०२४ (१५ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात येत आहे. तर १६ फेब्रुवारीपर्यंत अधिसूचीत असलेली गाडी क्र. ०२१४३ पुणे-नागपूर साप्ताहिक आता दि. ३१ मे .२०२४ (१५ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात येत आहे.