मुंबई ते हावडा या महत्वाच्या लोहमार्गावर असलेले अकोला रेल्वेस्थानक नेहमीच गजबजलेले असते. मध्य रेल्वे व दक्षीण- मध्य रेल्वेचे जंक्शन स्टेशन असल्यामुळे येथून पूर्व व पश्चिमेकडे तसेच दक्षीण व उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांची ये- जा सुरु असते. गतवर्षी कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर काही महिने रेल्वेची प्रवासी वाहतुक बंद होती. मिशन बिगीन अगेन अंतर्गत विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या असून, आता हळूहळू रेल्वे वाहतुक पूर्ववत होत आहे. तथापी, या विशेष गाड्यांमधून केवळ आरक्षित तिकीटांवरच प्रवास करता येत असल्याने आरक्षणासाठीची प्रतीक्षायादी मोठी आहे.
रोज धावतात ३० ते ३५ गाड्या
मध्य रेल्वेचे जंक्शन स्टेशन असलेल्या अकोला स्थानकावर रेल्वे गाड्यांची मोठा प्रमाणावर ये- जा सुरु असते. मध्य रेल्वेच्या बहुतांश गाड्या आता पूर्ववत सुुर झाल्याने अकोला स्थानकावरून दररोज साधारणपणे ३० ते ३५ गाड्या धावत आहेत. याशिवाय काही साप्ताहिक गाड्याही अकोल्याहून धावतात.
मुंबई वेटिंग, उत्तरेकडील गाड्यांमध्ये नो वेटिंग
अकोल्याहून मुंबई, पुणे व नागपूरकडे जाणार्या गाड्यांमध्ये प्रतीक्षायादी एप्रिलपर्यंत आहे. गीतांजली एक्स्प्रेस, हावडा मेल अमरावती- मुंबई या गाड्यांमध्ये आरक्षणाची स्थिती एप्रिलपर्यंत वेटिंगवर आहे. पुण्याकडे जाणार्या आझाद हिंद व महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्येही आरक्षण वेटिंगवरच आहे. उत्तर भारतात दिल्लीकडे जाणार्या गाड्यांमध्ये मात्र २८ मार्चपर्यंतची सर्व तिकिटे कन्फर्म झालेली होती
होळीच्या सुटीमुळे वाढली गर्दी
शनिवार, रविवारला लागून आलेल्या होळीच्या सुटीमुळे रेल्वेत गर्दी वाढली आहे. बाहेरगावी स्थायिक झालेले अकोलेकर होळीसाठी स्वगृही येण्यास प्राधान्य देत असल्याने गत दोन दिवसांपासून अकोला स्थानकावर गर्दी वाढली आहे.