ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 28 - नागरिकांवर करवाढ लादल्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी (२८ जून) अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात अकोला महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी भारिप-बमसंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर सामूहिक मुंडण आंदोलन करून सत्ताधारी भाजपचा जाहीर निषेध केला.
अकोलेकरांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सत्ताधारी भाजपाने प्रशासनाला हाताशी धरून अकोलेरांवर अवाजवी करवाढ लादली. करवाढ लागू करताना सभागृहात साधी चर्चादेखील केली नाही. त्यामुळे करवाढीचा ठराव नियम असल्याची टीका अॅड. आंबेडकरांनी यापूर्वीच केली आहे.
अकोलेकरांनी त्यांच्या जुन्या व चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराच्या जुन्या पावत्या घेऊन मोर्चात सामील होण्याचे आवाहन अॅड. आंबेडकर यांनी केले होते. यानुसार बुधवारी अॅड. आंबेडकर यांच्या नेतृत्वात विशाल मोर्चा महापालिकेवर धडकला. यावेळी मागणीचे निवेदन मनपा प्रशासनास देण्यात आले. बाहेर भारिप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंडण केले.