अकोला: मुगाचे दर या आठवड्यात प्रतिक्विंटल ६,५०१ रुपयांवर पोहोचले आहेत. तर सरासरी दर ५,६०० रुपये आहेत. दोन दिवसांपूर्वी हेच दर प्रतिक्विंटल ४,३०० रुपये होते. असे असले तरी शेतकऱ्यांना हमीदराने विक्री करण्यासाठी शसकीय मूग खरेदी केंद्राची प्रतीक्षा आहे.राज्यात सरासरी मुगाचे क्षेत्र ३ लाख ९७ हजार ४२४ हेक्टर आहे. तथापि, यावर्षी पाऊस उशिरा आल्याने क्षेत्र घटले असून, २ लाख ८४ हजार ७८८ हेक्टरवर ७२ टक्के पेरणी झाली. पेरणी केल्यानंतर चार आठवडे पावसाचा दीर्घ खंड पडल्याने मुगाचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी या पिकावर नांगर फिरविला. म्हणूनच शेतकºयांना उत्पादन खर्चावर आधारित दर हवे आहेत. शासनाने यावर्षी प्रतिक्विंटल ७ हजार ५० रुपये दर जाहीर केले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत हे दर ७५ रुपयांनी अधिक आहेत. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवार, २९ आॅगस्ट रोजी मुगाचे दर वाढल्याचे चित्र होते. दोन ते तीन दिवस अगोदरपर्यंत प्रतिक्विंटल ४,३०० रुपयांवर असलेले हे दर आजमितीस प्रतिक्विंटल सरासरी ५,६०० ते ६,५०१ रुपयांवर पोहोचले आहेत. हमी दरापेक्षा हे दर प्रतिक्विंटल ५५० रुपयांनी कमी आहेत. दरवर्षी मुगाची आवक १५ आॅगस्टपर्यंत सुरू होत असते. तथापि, यावर्षी अद्याप नवीन मुगाची अपेक्षित आवक सुरू झाली नाही. आवक सुरू झाल्यावर हे दर कायम राहतील की नाही, याबाबत साशंकता असल्याने शेतकºयांना शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.