तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीपासून जनता भाजी बाजाराच्या जागेवर भाजीपाला व फळ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्या आदेशानुसार दुकाने हटविण्यासाठी नाेटिसा बजावण्यात आल्या़ याप्रकरणी २४ व २५ मे राेजी मनपात प्रभारी उपायुक्त वैभव आवारे यांच्या दालनात पूर्व झाेनचे प्रभारी क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव यांनी सुनावणीदरम्यान व्यावसायिकांची बाजू ऐकून घेतली़ यादरम्यान, मनपाच्या वेगवान हालचाली पाहता व्यावसायिकांनी प्रशासनाच्या हेतूवर शंकाकुशंका निर्माण केल्या आहेत़ बाजू समजून न घेताच प्रशासन एकतर्फी कार्यवाही करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येताच भाजी बाजारातील सर्व संघटनांनी एकत्र येत शिवसेना आ़ नितीन देशमुख यांची भेट घेतली़ याप्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे बैठक आयाेजित करून सामंजस्याने ताेडगा काढण्यावर एकमत करण्यात आले़ यासंदर्भात आ़ देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे बैठकीची मागणी केली़ त्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २७ मे राेजी दुपारी १ वाजता मनपा आयुक्त निमा अराेरा यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत़
मंगळवारी ४० व्यावसायिकांची सुनावणी
दुकाने हटविण्याच्या मुद्यावर प्रशासनाने बजावलेल्या नाेटिसीला उत्तर देण्यासाठी मंगळवारी ४० व्यावसायिकांनी हजेरी लावली़ पूर्व झाेनचे प्रभारी क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव यांनी प्रक्रिया पूर्ण केली़
तरीही सुनावणी कशी ?
राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांनी जनता भाजी बाजाराच्या जागा हस्तांतरण प्रक्रियेला २१ मे राेजी स्थगिती दिली़ हा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना प्राप्त झाला आहे़ जागा हस्तांतरणाला स्थगिती असल्यामुळे मनपाकडून काेणतीही कार्यवाही हाेणे अपेक्षित नाही़ तरीही २४ व २५ मे राेजी मनपात व्यावसायिकांची सुनावणी का घेण्यात आली,असा सवाल उपस्थित झाला आहे़