मागील नऊ महिन्यांपासून संसर्गजन्य काेराेना विषाणूचे संकट कायम असून ते कमी हाेण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दिवाळीपूर्वी काेराेना रुग्णसंख्येचा आलेख घसरला हाेता. त्यामध्ये दिवाळीनंतर वाढ झाल्याचे समाेर आले आहे. शहरात दरराेज काेराेना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक कमालीचे बेफिकीर आढळून येत आहेत. सार्वजनिक जागा, बाजारपेठ आदी ठिकाणी फिरताना ताेंडाला मास्क, रुमाल न लावता संचार करीत आहेत. यामुळे काेराेनाच्या संक्रमणात झपाट्याने वाढ हाेत चालली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता मध्यंतरी राज्य शासनाने काेराेनाचे वाहक ठरणाऱ्या सुपर स्प्रेडरची आराेग्य चाचणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनासह महापालिकेला दिले. त्यानुषंगाने मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपायुक्त वैभव आवारे यांच्या निर्देशानुसार वैद्यकीय आराेग्य विभागाने शहरात उघड्यावर विविध साहित्याची विक्री करणाऱ्या लघु व्यावसायिक, फेरीवाल्यांच्या नाकातील स्त्रावाचे नमुने जमा केले.
४३१ सुपर स्प्रेडरचे घेतले नमुने
मनपाच्या वैद्यकीय आराेग्य विभागातील नागरी आराेग्य केंद्रांमधील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी अंगात पीपीइ किट घालून थेट रस्त्यावर उतरत ४३१ सुपर स्प्रेडरकडून नमुने जमा केले. ही माेहीम राबविताना आराेग्य कर्मचाऱ्यांना नानाविध अडचणींचा सामना करावा लागल्याची माहिती आहे.
हाॅकर्स म्हणाले चाचणीची गरज नाही!
रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या हाॅकर्सचे नमुने घेण्यासाठी गेलेल्या मनपाच्या पथकांना हाॅकर्सच्या राेषाचा सामना करावा लागला. अनेक हाॅकर्सनी चाचणीची गरज नसल्याचे सांगत नमुने देण्यास नकार दिला.