अकोला: वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केल्यानंतरही कामकाजात गती येत नसून, काही लाभार्थी अनुदानाची रक्कम वैयक्तिक कामासाठी वापरत असल्याचे उजेडात आले आहे. शौचालय उभारणीच्या कामात मनपाची यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचे पाहून मंगळवारी केंद्र शासनाकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. याअंतर्गत कंत्राटदारांमार्फत ही कामे करवून घेण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. ह्यस्वच्छ महाराष्ट्रह्णअभियान अंतर्गत मनपा क्षेत्रात वैयक्तिक शौचालय नसणार्या कुटुंबांचा शोध घेऊन, त्यांना शौचालय उभारून देण्याची जबाबदारी संबंधित मनपावर सोपविण्यात आली. अभियान अंतर्गत अकोला मनपाला पहिल्या टप्प्यात अडीच कोटी रुपयांचा निधी मिळाला. लाभार्थीला १२ हजार रुपयांच्या अनुदानातून स्वमालकीच्या जागेत सेप्टिक टॅँक बांधून, सीट बसवावी लागेल. मनपाने पात्र ५00 लाभार्थींच्या खात्यात पहिल्या टप्प्यानुसार प्रत्येकी सहा हजार रुपये जमा केले. सेप्टिक टॅँकचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित सहा हजार रुपये जमा केले जातील. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत किमान तीन हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असताना ५00 लाभार्थींपैकी अवघ्या २३ जणांनी सेप्टिक टॅँकचे खोदकाम पूर्ण केल्याची माहिती आहे. आता केंद्र शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, कंत्राटदारांच्या माध्यमातून शौचालय बांधकाम पूर्ण करून घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या मुद्दय़ावर सविस्तर चर्चा करण्यासाठी महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या दालनात सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक पार पडली. बैठकीला उपमहापौर विनोद मापारी, आयुक्त अजय लहाने, सुनील मेश्राम, हरीश आलीमचंदानी, योगेश गोतमारे,मंजूषा शेळके उपस्थित होते.
शौचालय उभारणीत महापालिका अपयशी
By admin | Published: December 02, 2015 3:00 AM