अकोला: नळ कनेक्शन वैध करून घेण्यासोबतच नळाला मीटर बसविणे व थकीत पाणीपट्टीचा भरणा करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून पाण्याचा अवैधरीत्या वापर करणारे ‘बीएसएनएल’चे अधिकारी-कर्मचारी व दूध डेअरी प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सोमवारी जलप्रदाय विभागाने केली.शहरवासीयांना दैनंदिन पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशातून मनपा प्रशासनाने घरोघरी नळ कनेक्शन वैध करून त्याला मीटर बसविण्याची मोहीम सुरू केली आहे. मीटरच्या माध्यमातून अकोलेकर नेमका किती लीटर पाण्याचा वापर करतात, याची अचूक आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध होऊन त्यानुषंगाने महान धरणातील जलसाठ्याचे नियोजन करता येणार आहे. सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी नळाला मीटर लावण्याची मोहीम राबविण्यात येत असली तरी अनेक नागरिकांकडे अद्यापही अवैध नळ कनेक्शन कायम आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, सर्वोपचार रुग्णालय प्रशासन, महावितरण प्रशासनासोबतच आता बीएसएनएल मधील अधिकारी-कर्मचारी व दूध डेअरी प्रशासनातील अधिकारी-कर्मचाºयांच्या शासकीय निवासस्थानांची भर पडली आहे. या विभागांकडे मागील अनेक वर्षांपासून पाणीपट्टी थकीत असण्यासोबतच अद्यापही नळांना मीटर लावले नसल्याची परिस्थिती आहे. यासंदर्भात महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने वारंवार सूचना दिल्या आहेत. या सूचनांचा काहीही उपयोग होत नसल्याचे पाहून अखेर सोमवारी कृषी नगरस्थित बीएसएनएलच्या उपमंडलीय अभियंता-कर्मचारी यांच्या ४८ निवासस्थानांचा तसेच शासकीय दूध डेअरी येथील २२ निवासस्थानांची नळ जोडणी खंडित करण्यात आली.मुख्य जलवाहिनीवर ‘टॅपिंग’जवाहर नगर परिसरातील महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरीत्या ‘टॅपिंग’ करून पाण्याची चोरी केली जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. जलप्रदाय विभागाने या ठिकाणी धाव घेऊन शोध घेतला असता एक-दोन नव्हे तर तब्बल ७१ अवैध नळ कनेक्शन आढळून आले. मनपा कर्मचाºयांनी सर्व कनेक्शन तातडीने खंडित केले.