शहरातील मुख्य बाजारपेठ,शासकीय आवारभिंती, माेठे नाले तसेच प्रमुख चाैकांमध्ये अतिक्रमकांनी बजबजपुरी निर्माण केल्याची परिस्थिती आहे. यामुळे वाहतुकीच्या काेंडीसह अनेक समस्या निर्माण झाल्या असून अतिक्रमकांच्या मुजाेरीसमाेर प्रशासनाने गुडघे टेकल्याचे चित्र हाेते. गांधीराेड, खुले नाट्यगृह ते शास्त्री स्टेडियम ते दीपक चाैक, मानेक टाॅकीज ते टिळकराेड, सिटी काेतवाली ते गांधी चाैक, जैन मंदिर परिसर व गांधी चाैकातील चाैपाटीवर अतिक्रमकांनी ठिय्या मांडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून धड चालणेही मुश्कील झाले हाेते. मनपाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच अवघ्या सातव्या दिवसापासून निमा अराेरा यांनी अतिक्रमण हटाव माेहिमेला प्रारंभ केला. तत्पूर्वी संबंधित व्यावसायिकांना खुले नाट्यगृहामागील जागा व भाटे क्लब मागील जागेत पर्यायी व्यवस्था करून दिली. यानंतरही अतिक्रमण थाटणाऱ्या व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई मनपाने सुरू केली आहे. प्रशासन जप्त साहित्याचा लिलाव करणार असल्याची माहिती आहे.
आयुक्तांची राेखठाेक भूमिका
शहरातील सर्व प्रमुख रस्ते, चाैक व गल्लीबाेळातही किरकाेळ व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असला तरी राजकारण्यांकडून या समस्येकडे साेयीनुसार दुर्लक्ष केले जात आहे. मतांच्या समीकरणापायी मनपातील सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक अतिक्रमकांची पाठराखण करतात. त्यामुळे मनपा आयुक्त निमा अराेरा ही समस्या निकाली काढतील की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. मागील काही दिवसांपासून आयुक्तांनी अतिक्रमकांना सळाे की पळाे करून साेडल्याचे दिसून येत आहे.
दगडफेक करणाऱ्यांविराेधात गुन्हा दाखल
जनता भाजीबाजारात कारवाईसाठी गेलेल्या मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर भाजीपाला व्यावसायिकांनी दगडफेक केल्याची घटना १६ मार्च राेजी घडली हाेती. याप्रकरणी मनपाने सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली असता पाेलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. तसेच गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. पाेलीस कारवाईच्या भीतीपाेटी काही भाजीपाला विक्रेते भूमिगत झाल्याची माहिती आहे.