मागील तीन वर्षांच्या कालावधीत महापालिकेच्या विविध विभागांतील घाेटाळे चव्हाट्यावर आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सिमेंट रस्त्यांचा समावेश असून, अवघ्या सहा महिन्यांतच शहरातील सिमेंट रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे सादर झालेल्या साेशल ऑडिटच्या अहवालात सहा सिमेंट रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट व दर्जाहिन असल्याचे नमूद करण्यात आले हाेते. अहवालानुसार संबंधित ठेकेदार, बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या विराेधात कारवाई करण्याचे निर्देश आस्तिककुमार पांडेय यांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना दिले हाेते. आयुक्त कापडणीस यांनी कारवाई न करता सखाेल चाैकशी व तपासणीसाठी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’ची नियुक्ती केली. मागील दाेन वर्षांपासून अद्यापही या प्रकरणी आयुक्तांनी कारवाईसाठी हालचाली केल्या नसल्याचे समाेर आले आहे. ‘स्वच्छ भारत’अभियानाअंतर्गत कागदाेपत्री बांधण्यात आलेल्या शाैचालयांप्रकरणी प्रशासनाने २९ काेटींची देयके अदा केली आहेत. याप्रकरणी उपायुक्त वैभव आवारे यांना चाैकशी करण्याचे निर्देश आयुक्त कापडणीस यांनी २०१९ मध्ये दिले हाेते. अद्यापही याप्रकरणी कारवाई झाली नाही, हे विशेष. यांसह सायकल खरेदी घाेळ, विद्यार्थिनींना हायजिन किट वाटप प्रकरणात चाैकशी अहवाल प्राप्त झाल्यावरही आयुक्तांनी दाेषींवर कारवाई केली नाही. नगररचना विभागाच्या माध्यमातून फायलींना नियमबाह्यरीत्या मंजुरी दिली जात असताना त्याला आळा घालण्यात आयुक्त कापडणीस कुचकामी ठरले आहेत.
बदलीचे वेध लागताच मनपाकडे पाठ
मनपातील नियमबाह्य कामकाज व विविध घाेटाळ्यांत आयुक्त संजय कापडणीस कारवाई करीत नसल्याचे पाहून शिवसेनेने राज्य शासनाकडे तक्रार केली आहे. प्राप्त तक्रारीची शासनाने गंभीर दखल घेत आयुक्तांच्या उचलबांगडीचे संकेत दिले आहेत. बदली हाेण्याचे वेध लागताच आयुक्तांनी मनपाकडे पाठ फिरवल्याचे समाेर आले आहे.
आयुक्त १७ मिनिटांत परतले !
मनपात बुधवारी आयुक्त संजय कापडणीस सकाळी दाखल झाले. अन् अवघ्या १७ मिनिटांत निवासस्थानी निघून गेले. राहत्या घरून नगररचना व बांधकाम विभागातील अतिमहत्त्वाच्या फायलींचा निपटारा करण्यात आल्याची माहिती आहे.