अकाेला : महानगरपालिकेचे सन २०२-२१ चे सुधारित व सन २०२१-२२चे मूळ अंदाजपत्रक गुरुवारी प्रशासनातर्फे स्थायी समितीपुढे सादर करण्यात आले. यावेळी समिती सदस्यांनी काही तरतुदींवर आक्षेप घेतल्याने सत्ताधाऱ्यांनी भूमिका घेत अखेर वाढीव दुरुस्तीसह अंदाजपत्रक महासभेपुढे मांडण्यासाठी मंजुरी दिली. गतवर्षी काेराेनामुळे निर्माण झालेली अस्थिरता अद्यापही कायम असल्याची परिस्थिती आहे. कोरोनामुळे करदात्यांनी थकबाकी जमा करण्यास आखडता हात घेतल्याने महापालिकेचे अर्थचक्र विस्कळीत झाले आहे. शिक्षकांचे डिसेंबर महिन्यांपासून वेतन थकीत आहे. अशा स्थितीत यंदाच्या अर्थसंकल्पात मनपा प्रशासन नेमक्या काेणत्या तरतुदी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते उत्पन्नाचे मर्यादित स्त्रोत, मालमत्ता करावरच अधिक अवलंबून रहावे लागत असल्याने शासनाच्या निधीवर चालणारा प्रशासकीय खर्च व त्यामुळे सर्व ताळेमेळ जुळवित मनपाचे सन २०२१-२२ चे एकूण ५२०.५५ कोटी अपेक्षित उत्पन्न दर्शविण्यात आलेले अंदाजपत्रक मनपा प्रशासनातर्फे स्थायी समितीपुढे सादर करण्यात आले.
मनपाच्या उत्पन्नात सर्वाधिक वाटा मालमत्ता कराचा आहे. काेराेनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडल्यामुळे त्यांनी मालमत्ता कर जमा करण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. यामुळे मनपासमाेर पेच निर्माण झाला असून, थकबाकीची रक्कम वसुलीसाठी मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. मालमत्ताकराच्या आकड्यावरून प्रशासनाचा चांगलाच गाेंधळ उडाल्याचे दिसून आले प्रत्यक्षातील मालमत्ता कर व अंदाजपत्रकात दर्शविण्यात आलेल्या अपेक्षित मालमत्ता कर यांचे आकडे विसंगत असल्याची बाब शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांच्या निदर्शनास आली त्यांनी प्रारंभीच अंदाजपत्रकातील तरतुदींवर आक्षेप नोंदविला. त्यावर दुरुस्तीकरून अंदाजपत्रक महासभेपुढे सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले या सभेत उत्पन्न वाढीपेक्षा अधिक खर्चाच्या बाबींच्या दुरुस्तीही सदस्यांनी सुचविल्यात. या सभेला स्थायी समिती सभापती संजय बडाेणे मनपा उपायुक्त पंकज जावळे नगर सचिव अनिल बिडवे आदींसह अधिकारी उपस्थित हाेते.
बाॅक्स
मनपाच्या उत्पन्नात स्थानिक संस्था करा पोटी शासनाकडून मिळणाऱ्या ८१ कोटी अनुदानाचा माेठा वाटा आहे. पाणीपट्टीचे १३ कोटींसह इतर एकूण २३१.२० कोटी रुपये हा मनपा निधी अंदाजपत्रकात दर्शविण्यात आला आहे. त्यात १७९.८० कोटी भांडवली जमा, जो शासनाकडून मिळणारा निधी व निलंबन लेखे यातून मिळणारे १०९.५५ कोटी, असे एकूण ५२०.५५ कोटी अपेक्षित उत्पन्न दाखविण्यात आले. एकूण खर्च ५१९.३२ कोटी दर्शविण्यात आला असून, मनपा निधीचे ९.२९ कोटीसह एकूण १२.९१ कोटी शिल्लक दर्शविण्यात आली होती.