अकोला: महापालिका प्रशासनाच्यावतीने मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना मतदान करणे अधिक सोयीचे व्हावे तसेच गरज भासल्यास वैद्यकीय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोमवारी मनपाच्या आवारात मदत कक्षाचे गठन करण्यात आले आहे. हा कक्ष १८ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध राहणार आहे.अकोला लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया १८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सुरू होईल. निवडणुकीच्या धामधुमीत दिव्यांग मतदारांच्या मतदानाकडे दुर्लक्ष होते. त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मोठी कसरत करावी लागते. यामुळे दिव्यांगांच्या मतदानाची टक्केवारी कमी दिसून येते. ही बाब लक्षात घेता यंदा निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांची नोंदणी, त्यांची संख्या आदींवर लक्ष केंद्रित केले असून, त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहने, व्हीलचेअर आदी व्यवस्था करण्यासाठी महापालिका क्षेत्रासाठी मनपाच्या सहायक आयुक्त पूनम कळंबे यांची नोडल अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुषंगाने मनपा आवारात दिव्यांग कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.दिव्यांगांना मिळतील सुविधा!दिव्यांग मतदार कोणत्याही प्रभागातील असो, त्याला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी दिव्यांग कक्षाकडून ठोस मदत उपलब्ध करून दिली जाईल. त्यामध्ये वाहनांची व्यवस्था असून, मतदाराला गरज पडल्यास वैद्यकीय आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.हा घ्या टोल फ्री क्रमांक!मदत कक्षामध्ये मनपा कर्मचारी बाळू बनकर, शशिकांत सर्जेकर, दिनेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षात संपर्क साधण्यासाठी मनपाने ०७२४-२४३४४१२ तसेच टोल फ्री क्रमांक १८००२३३५७३३ उपलब्ध करून दिला आहे. तसेच वैद्यकीय आरोग्य सेवा देण्यासाठी डॉ. वासिक अली, डॉ. अस्मिता पाठक, डॉ. प्रभाकर मुदगल, डॉ. छाया उगले यांच्यासह सहा. आरोग्य सेवक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शहरातील दिव्यांग मतदारांसाठी मनपाच्यावतीने मदत कक्षाचे गठन करण्यात आले आहे. मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणे व नंतर घरी सोडून देण्याची सोय केली जाणार आहे.- पूनम कळंबे, नोडल अधिकारी, मनपा