अकोला : शहरात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता, त्याला अटकाव घालण्यासाठी आज, शुक्रवारपासून शहरातील व्यापारी, किरकोळ व्यावसायिक, फेरीवाले व कामगारांचे स्राव घेण्यासाठी महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविली जाणार आहे. तसा निर्णय गुरुवारी महापालिकेमध्ये महापौर अर्चना मसने, प्रभारी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या बैठकीत घेण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर प्रभावीपणे उपाययोजना करण्यासाठी व नियंत्रण आणण्यासाठी गुरुवारी स्थायी समितीच्या सभागृहात महापौर अर्चना जयंत मसने यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये स्थायी समितीचे सभापती सतीश ढगे, विरोधी पक्षनेता साजीदखान पठाण, झोन समिती सभापती मनीषा भंसाली, शारदा ढोरे, रश्मी अवचार, जयश्री दुबे, चांदणी शिंदे, माजी नगरसेवक जयंत मसने, मनोज गायकवाड, सिद्धार्थ उपरवट, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावावर जास्त प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात असलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करवून घेण्यासाठी तसेच कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगसाठी एका रुग्णमागे किमान ३० अतिनिकटच्या नागरिकांचे स्राव घेण्याच्या कामासाठी मदत करण्याची विनंती केली. तसेच ज्या भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असेल त्या भागात कोरोनाची चाचणीसाठी शिबिराचे आयोजन करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सार्वजनिक शौचालय व सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये दररोज निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्याची सूचना डॉक्टर जावळे यांनी केली. प्राप्त अहवालानुसार सक्रिय रुग्णांची संख्या १६४७ असून होम आयसोलेशनमध्ये ९७९ रुग्ण आहेत.
महापालिका पदाधिकारी प्रशासनाच्या पाठीशी
संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबद्दल महापौर अर्चना मसने यांनी समाधान व्यक्त केले. अशा संकटसमयी महापालिकेतील सर्व पदाधिकारी प्रशासनाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अकोलेकरांनो, प्रशासनाला सहकार्य करा!
कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे, मास्क व सॅनिटायझरचे वापर करावा. तसेच प्रशासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन महापौर अर्चना मसने यांनी यावेळी केले.