जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसरात ७ एप्रिल २०२० रोजी आढळून आला होता. आजरोजी शहरात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत चालली आहे. शहराच्या पूर्व व दक्षिण झोनमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून महापालिकेचे प्रभारी आयुक्त डाॅ. पंकज जावळे यांनी फिरत्या वाहनांद्वारे संशयित नागरिकांचा स्वॅब घेण्याचे निर्देश जारी केले आहेत. संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात होणार नाही, यासाठी मनपा प्रशासनाच्या स्तरावर दक्षता घेतली जात असली तरी नागरिकांच्या मनमानी समोर प्रशासन हतबल ठरत असल्याचे चित्र आहे. यादरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असलेल्या भागात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये मधुमेह व इतर गंभीर व्याधी असल्याचे समाेर येत आहे. एकूणच परिस्थिती लक्षात घेता वयोवृद्ध नागरिकांना कोरोनाची लवकर लागण होत असल्याचे दिसून येत आहे. या पृष्ठभूमीवर प्रभारी आयुक्त डाॅ. पंकज जावळे यांनी आराेग्य सर्वेक्षणासाठी गठित केलेल्या पथकांना वयोवृद्ध नागरिक व लहान मुलांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत.
खासगी रुग्णालयांना निर्देश
महापालिकेने सर्व खासगी हॉस्पिटल तसेच क्लिनिकमध्ये आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या वयोवृद्ध रुग्णांची विशेष नोंद घेण्याची सूचना संबंधित रुग्णालय प्रशासनाला केली आहे. याची माहिती मनपाला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच शहरातील सर्व मेडिकल स्टाेअर्स संचालकांनी सर्दी, खाेकला व ताप असलेल्या रुग्णांना डाॅक्टराच्या चिठ्ठीशिवाय औषधी न देण्याचेही निर्देश आहेत.
खासगी रुग्णालयात गर्दी
काेराेनासदृश आजाराने हैराण असलेल्या नागरिकांनी काेराेना चाचणीकडे पाठ फिरवल्याची परिस्थिती आहे. असे नागरिक खासगी रुग्णालयांत गर्दी करीत आहेत. शहरात सर्वाधिक खासगी हॉस्पिटलची संख्या पूर्व व दक्षिण झोनमध्ये आहे. यासह पश्चिम व उत्तर झोनमध्येही लहान-मोठी रुग्णालये व क्लिनिक आहेत. या रुग्णालयांत तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात किती रुग्णालये नियमांचे पालन करतात, याकडे लक्ष लागले आहे.