अकाेला : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत कचरामुक्त शहराची संकल्पना राबविली जात आहे. त्या अनुषंगाने स्वच्छतेच्या कामांची केंद्रीय पथकांकडून पाहणी केली जात आहे. काही महापालिकांच्या स्तरावर चांगले रेटिंग (गुणांकन) मिळावेत, यासाठी पथकातील सदस्यांसाेबत सेटिंग करण्यासाठी चांगलीच धावाधाव केली जात असल्याची माहिती आहे. यामुळे केंद्रीय पथकांची विश्वासार्हता धाेक्यात आली आहे. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत महापालिकांना पहिल्या टप्प्यात शहर हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले हाेते. नागरिकांना वैयक्तिक शाैचालय बांधून दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शहरात निर्माण हाेणाऱ्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे, त्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खताचे उत्पादन करणे तसेच केंद्रीय पथकामार्फत वेळाेवेळी शहरांमधील स्वच्छतेच्या कामांची पाहणी करून त्यांना गुणांकन (रेटिंग) देणे आदी निकषांचा समावेश आहे. मध्यंतरी काेराेनामुळे या तपासणीला ‘ब्रेक’ लागला हाेता. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेताच केंद्र शासनाचा चमू सरसावला असून ‘कचरामुक्त शहर’(जीएफसी-गारबेज फ्री सीटी) अंतर्गत शहरामधील स्वच्छतेच्या कामांची प्रत्यक्षात पाहणी केली जात आहे.
तपासणीनंतर गुणांकन
केंद्रीय पथकांमार्फत सार्वजनिक शाैचालये, उघड्यावर साचणाऱ्या कचऱ्याची ठिकाणे तसेच प्रभागातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली जात आहे. नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतर गुणांकन दिले जाणार आहे.
पथकांची बडदास्त राखताना कसरत
केंद्रीय पथकांनी चांगले गुणांकन द्यावेत, यासाठी महापालिकांच्या स्तरावर पथकांची बडदास्त राखली जात आहे. तीन वर्षांपूर्वी अकाेला मनपाच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालात अशा पथकासाठी स्वच्छता व आराेग्य विभागाने उच्चप्रतीची दारू खरेदी केल्याची पावती जाेडण्याचा उल्लेख केला हाेता हे विशेष.