अकोला: शालेय सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी ह्यशाळा प्रवेशोत्सवाह्णला खुद्द शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी दांडी मारण्याचा प्रकार लोकमतने २७ जूनच्या अंकात उघडकीस आणला. या प्रकाराची गंभीर दखल घेत भाजप-शिवसेना नगरसेवकांनी शिक्षणाधिकार्यांच्या निलंबानाची मागणी लावून धरल्यानंतर मंगळवारी आयुक्त सोमनाथ शेटे यांनी शाहीन सुलताना यांच्यासह थकीत देयकांची खिरापत वाटणार्या प्रभारी लेखापाल अरुण पाचपोर यांच्या निलंबनाचा आदेश दिला. विद्यार्थ्यांंना शिक्षणाप्रती आवड निर्माण व्हावी तसेच उत्साह वाढविण्यासाठी शासनाने ह्यशाळा प्रवेशोत्सवाह्णचे आयोजन करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले होते. २५ जूनच्या रात्री आठ वाजेपर्यंंत महिला बचत गटांना खिचडीचा कंत्राट देण्याचा आटापिटा करणार्या शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी २६ जून रोजी शाळा प्रवेशोत्सवाला अनुपस्थित राहणे पसंत केले. उपमहापौर विनोद मापारी व प्रशासन अधिकारी प्रदीप चोरे यांनी शाळा प्रवेशोत्सवाला हजेरी लावून शाळांची पाहणी केली असता, अनेक शाळांमध्ये सकाळी ७ वाजतापासून ते दुपारी ३ पर्यंंत खिचडीसाठी विद्यार्थ्यांंना ताटकळत ठेवण्यात आल्याचे समोर आले. शाळा प्रवेशाचे नियोजन नसल्याने सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंंत शाळा सुरू होत्या. बहुतांश शाळेत विद्यार्थ्यांंना खिचडी न देता बिस्कीटचे वाटप करून वेळ मारण्यात आली. यादरम्यान, शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना अनुपस्थित असल्याचा मुद्दा लोकमतने लावून धरला. यावर उपमहापौर विनोद मापारी यांनी शिक्षणाधिकार्यांवर कारवाई करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. आयुक्त कारवाई करीत नसल्याचे पाहून भाजपने पुढाकार घेत, हुतात्मा स्मारक येथे आयुक्तांना घेराव घातला. यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल, योगेश गोतमारे, अजय शर्मा, बाळ टाले, सतीश ढगे,राहुल देशमुख, विजय इंगळे, प्रशांत अवचार, गौतम गवई,राजेश मिश्रा यांचा समावेश होता. नगरसेवकांची आक्रमक भूमिका पाहता आयुक्त शेटे यांनी तत्काळ शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना, प्रभारी लेखापाल अरुण पाचपोर यांना निलंबित करण्याचा आदेश काढला.
मनपा शिक्षणाधिकारी, प्रभारी लेखापाल निलंबित
By admin | Published: July 01, 2015 1:38 AM