अकोला: निर्माणाधीन इमारतींचे मोजमाप करण्याच्या सबबीखाली मालमत्ताधारकांकडून पैसे वसूल करणाºया तसेच रस्ता, नाली, पेव्हर ब्लॉकसह इतर कामांची तपासणी केल्यानंतर कमिशनसाठी हपापलेल्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांवर कारवाई होणार असल्याची कुणकुण लागताच संबंधित तीन कंत्राटी अभियंत्यांनी महापालिकेतून पळ काढला आहे. तसा ‘ना’राजीनामा त्यांनी संबंधित एजन्सीकडे सादर केल्याची माहिती आहे.महापालिकेचा आकृतिबंध तयार नसल्यामुळे कर्मचाºयांच्या रिक्त पदांचा अनुशेष कायम आहे. तांत्रिक संवर्गातील पदांचा मोठा अनुशेष असून, सक्षम अधिकारी-कर्मचाºयांच्या अपुºया संख्येअभावी मनपाचा प्रशासकीय कारभार प्रभावित आहे. जलप्रदाय विभाग, बांधकाम विभाग तसेच नगररचना विभागात तांत्रिक पदांसाठी आस्थापनेवरील कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे प्रशासनाने मानसेवी कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. याव्यतिरिक्त खासगी एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी तत्त्वावर कनिष्ठ अभियंतापदी कर्मचारी नियुक्त केले. यातील अनेक अभियंते नवखे असले तरी काही अभियंत्यांनी प्रशासनाला न जुमानण्याचे धोरण स्वीकारले होते. बांधकाम विभागात कार्यरत कनिष्ठ अभियंता तसेच नगररचना विभागात कार्यरत अभियंत्यांनी महापालिकेची गरिमा न ठेवता खिसे भरण्याचा उद्योग सुरू केला होता. उत्तर झोनसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंत्याने काँग्रेस नगरसेविकेच्या पतीसोबत हातमिळवणी करून इमारतींचे बांधकाम करणाºया मालमत्ताधारकांकडून पैसे वसुली सुरू केली होती. याप्रकरणी मनपा प्रशासनाकडे तक्रारीही प्राप्त झाल्या. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी बांधकाम विभाग, नगररचना विभागासह इतर विभागातील कंत्राटी कर्मचाºयांच्या बदलीचा निर्णय घेण्यासोबतच खादाड कर्मचाºयांवर कारवाईचा इशारा दिला होता. कारवाई झाल्यास बदनामी होईल, या विचारातून तीन कंत्राटी कर्मचाºयांनी आधी मनपाकडे व नंतर एजन्सीकडे राजीनामा सादर केला.‘आउट सोर्सिंग’; मनपाला मनस्तापमनपात कंत्राटी तत्त्वावर अभियंते नियुक्त केल्यास प्रशासकीय कामकाज गतिमान होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा होती. त्यासाठी मनपाने ‘आउट सोर्सिंग’मार्फत कर्मचारी नियुक्त केले. यातील अनेक कर्मचाºयांकडे शैक्षणिक पात्रता असली तरी कामकाजाचा अनुभव, पैसे खाण्याची वृत्ती व कामचुकारपणा लक्षात घेता आगामी दिवसांत कंत्राटी कर्मचाºयांमध्ये कपात केली जाणार असल्याची माहिती आहे.