अकोला: शासन निधीतून शहरात पूर्ण करण्यात आलेल्या दोन रस्ते कामांचा अहवाल महानगरपालिका आयुक्तांनी शनिवारी जिल्हाधिकाºयांकडे सादर केला. या अहवालात मनपाच्या संबंधित अभियंत्यांंनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, ‘क्युरिंग’ कालावधी संपला नसताना नागरिकांनी वाहनांची ये-जा केल्याने काही ठिकाणी रस्ते नादुरुस्त (खराब) झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे म्हटले आहे.शासनाकडून प्राप्त विशेष निधीतून आणि खड्डेमुक्त रस्ते अभियान अभियानांतर्गत शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे; परंतु अकोला शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांना एक वर्षाचा कालावधी झालेला नसताना, त्यापैकी अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शहरातील टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट, अग्रसेन चौक ते दुर्गा चौकपर्यंतच्या रस्ते कामाची पाहणी केली असता, रस्त्यांच्या कामांसंदर्भात कोणतीही तपासणी करण्यात आली नसून, त्यामुळेच रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याची स्थिती आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे करणाºया संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांचे स्पष्टीकरण अभिप्रायासह सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मनपा आयुक्त व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना १३ जुलै रोजी बजावलेल्या नोटीसद्वारे दिला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या अशोक वाटिका ते सरकारी बगिचापर्यंत रस्त्याच्या कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी १४ जुलै रोजी जिल्हाधिकाºयांकडे स्पष्टीकरण सादर केले होते. त्यानंतर टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक आणि अग्रसेन चौक ते दुर्गा चौक या दोन रस्ते कामांचा अहवाल मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मनपाच्या शहर अभियंता, कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांच्या स्पष्टीकरणासह २० जुलै रोजी जिल्हाधिकाºयांकडे सादर केला. या अहवालात मनपाच्या शहर अभियंता, कार्यकारी अभियंता आणि शहर उपअभियंत्यांनी स्पष्टीकरण सादर केले आहे. त्यानुसार संबंधित दोन्ही रस्ते कामांचा ‘क्युरिंग’ कालावधी संपला नसताना नागरिकांनी रस्त्यावरून वाहनांची ये-जा केल्याने रस्ते काही ठिकाणी नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे अभियंत्यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे. त्यामुळे मनपा अभियंत्यांच्या लेखी लोकांच्या राबत्याने रस्ते खराब झाल्याचे स्पष्ट होत आहे.
वापरलेले साहित्य चांगल्या दर्जाचे; रस्त्यांचा ३ टक्केच पृष्ठभाग खराब!दोन्ही रस्त्यांच्या कामांत वापरण्यात आलेले साहित्य चांगल्या दर्जाचे होते. तसेच दोन्ही रस्ते कामांच्या संपूर्ण क्षेत्राच्या अंदाजे ३ ते ४ टक्केच रस्त्याचा पृष्ठभाग खराब झाला आहे, असा दावाही मनपाच्या अभियंत्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात केला.जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार दोन रस्ते कामांचा अहवाल संबंधित अभियंत्यांच्या स्पष्टीकरणासह जिल्हाधिकाºयांकडे सादर केला आहे.- जितेंद्र वाघ, आयुक्त, मनपा