मागील काही दिवसांपासून काेराेनाचा अतिशय वेगाने प्रसार हाेत असल्याचे दिसून येत आहे. काेराेना रुग्णांच्या संख्येत हाेणारी वाढ पाहता जिल्हा सामान्य रुग्णालय व मनपाच्या चिंतेत भर पडली आहे. यादरम्यान, शासनाने लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. त्या आनुषंगाने शासकीय वैद्यकीय आराेग्य यंत्रणांसाेबतच काही खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाला परवानगी देण्यात आली. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, महापालिकेचे रुग्णालय तसेच मनपाच्या अखत्यारित असणाऱ्या नागरी आराेग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध आहे. अर्थात शासकीय लसीकरण केंद्रांची संख्या १२ असून, याव्यतिरिक्त दहा खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. अशा एकूण २२ ठिकाणी ६० व ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण केल्या जात असले तरी मागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालयांमधील गर्दी ओसरत असल्याचे समाेर आले आहे. त्यातुलनेत महापालिकेचे कस्तुरबा गांधी रुग्णालय, किसनीबाई भरतिया रुग्णालय, ‘जीएमसी’ तसेच नागरी आराेग्य केंद्र आघाडीवर आहेत.
‘या’ रुग्णालयांना नागरिकांचा प्रतिसाद
शासनाने शहरातील दहा खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली आहे. यापैकी संत तुकाराम हाॅस्पिटल, बसंती हाॅस्पिटल, आयुर्वेदिक रुग्णालय तसेच आयुर्वेदिक महाविद्यालयात नागरिक लसीकरणासाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे.
सुटीच्या दिवशीही लसीकरण
शहरातील लाेकसंख्येच्या निकषानुसार शासकीय रुग्णालयांना दरराेज १०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. खासगी रुग्णालयांना चाेवीस तास लसीकरण सुरू ठेवता येइल. परंतु तसे त्यांना बंधनकारक नाही. दरम्यान, ३० एप्रिलपर्यंत शासकीय रुग्णालयांना सुटीच्या दिवशी तसेच रविवारीदेखील लसीकरण सुरू ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
गर्दी का ओसरली?
खासगी रुग्णालयांत लस टाेचण्यासाठी २५० रुपये शुल्क आकारल्या जाते. लस घेतल्यानंतर काही काळ रुग्णालयात थांबावे लागत असल्याने उपलब्ध साेयी-सुविधा ध्यानात घेता नागरिकांनी खासगी रुग्णालयांना प्राधान्य दिले. लस घेतल्यानंतर काेणतेही दुष्परिणाम समाेर न आल्यामुळे तसेच हीच लस शासकीय रुग्णालयांमध्ये माेफत असल्यामुळे नागरिकांचा ओढा शासकीय रुग्णालयांकडे वाढल्याची माहिती आहे.