अकोला : आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद अब्दुल बशीर व त्यांचे सहकारी मौलवी शेख शफी शेख कादरी यांच्या हत्याकांड प्रकरणातील नवव्या आरोपीस अटक करण्यात खदान पोलिसांना यश आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी सै. महेफुज सै.मेहबुब असे या आरोपीचे नाव असून, त्याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.दामले चौकातील केदार मंदार अपार्टमेंटमधील रहिवासी मुकीम अहमद अब्दुल बशीर व बुलडाण्याच्या साखरखेर्डा या गावातील त्यांचा सहकारी शेख शफी शेख कादरी या दोघांची खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या आझाद कॉलनी येथील रहिवासी मौलवी तब्बसूर कादरी याच्या निवासस्थानी गळा आवळून हत्या करण्यात आली होती. दोघांचेही मृतदेह पोत्यात बांधून कारने बुलडाणा जिल्ह्यातील साकर्शा जंगलात फेकण्यात आले होते. या हत्याकांडामागे मुख्य सूत्रधार शेख चांद व शेख कौसर शेख अफसर हे दोघे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र, ते दोघेही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, या प्रकरणातील आठ आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली असून, नवव्या आरोपीस यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी सै. महेफुज सै. मेहबूब यास अटक करण्यात आली आहे. खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांच्या पथकाने या आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष महल्ले करीत आहेत.अटकेतील आरोपीमौलवी तसब्बूर कादरी रा. अकोला, जब्बार खा सत्तार खा, सै. अस्लम सै. हुसेन दोघेही रा. वाकद वाशिम, शेख इम्रान शेख कदीर व शेख मुक्तार शेख नूर रा. मेहकर, शब्बीरशहा अन्वरशहा रा. खाकडी बुलडाणा, कारचालक संदीप आत्माराम दातार, सै. महेफुज सै.मेहबूब यांचा अटकेतील आरोपींमध्ये समावेश आहे.