दोन आरोपी गजाआड
अकोट फाइल पोलिसांची कारवाई
अकोला : अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर पीडित कॉलनी येथे क्षुल्लक कारणावरून एका किरकोळ व्यवसायिकाची तिघांनी हत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अकोट फाईल पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना सहा तासाच्या आत अटक केली.
संत कबीर नगर येथील रहिवासी नरेश खुशाल मेगवाणे वय 52 वर्ष व सोहम गौतम गायकवाड हे दोघे चांगले मित्र असून ते अकोट फाईल व रेल्वेस्टेशन परिसरात खरमुरे फुटाणे विक्रीचा किरकोळ व्यवसाय करीत होते. या दोघांमध्ये व्यवसायातील उधारीवरून आठ दिवसांपासून वाद सुरू झाले. या वादातच सोहम गौतम गायकवाड राहणार पूर पीडित क्वॉर्टर, रोहित गायकवाड व राजकुमार या तिघांनी नरेश खुशाल मेगवाणे यांना पूरपीडित कॉलनी परिसरात बोलावून त्यांची निर्घुण हत्या केली. त्यानंतर तीनही आरोपी गोदाम परिसरातून फरार झाले.या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. त्यानंतर ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाच्या इशाऱ्यावरून पोलिसांनी तातडीने अकोट रोडवरील एका परिसरातून सोहम गौतम गायकवाड व रोहित गायकवाड या दोघांना ताब्यात घेतले. व्यवसायातील उधारीच्या कारणावरून हे हत्याकांड झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांसमोर कबुली केली. याप्रकरणी अकोट फाईल पोलिसांनी सोहम गायकवाड व रोहित गायकवाड आणि राजकुमार नामक युवकाविरूद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 302, 120 ब व 34 अन्वये गुन्हा दाखल केला. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून राजकुमार नामक युवक फरार आहे. अकोट फाइल पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या आरोपींना अटक करण्याची कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम, अकोट फाईल पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नितीन सुशिर, सुनील टोपकर, शेख असलम, संजय पांडे, श्रीकांत पवार, श्याम आठवे, दिलीप इंगोले, सिद्धार्थ जवंजाळ व दाते मेजर यांनी केली. या हत्याकांड प्रकरणातील आरोपींना रविवारी जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
शहरात हत्याकांडाचे सत्र सुरूच
आठवड्याभरात शहरात हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. 8 मार्च रोजी श्याम घोडे नामक इसमाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मुलीने जन्मदात्या आईची हत्या केली. या घटना ताज्या असतानाच एका 18 वर्षीय मुलीचा संशयास्पद अर्धवट जळालेला मृतदेह शनिवारी आढळला. त्यानंतर सायंकाळीच अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत नरेश यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यावरून शहरात दिवसाआड हत्या होत आहे.