धम्माल ऊर्फ आदेश आटोटे हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित होता. तो औरंगाबाद येथे वास्तव्यास होता. भाच्याच्या लग्नासाठी २९ जून रोजी गावी आला होता. आरोपी दीपकराज डोंगरे (५५), रा. प्रतीकनगर मूर्तिजापूर हा २९ जूनपासून धम्माल याच्या मागावर होता. परंतु, ३० जून रोजी दीपकराज डोंगरे याने धम्माल याला घरीच समशेरपूर येथे गाठून त्याच्या पोटावर चाकूने व कोयत्याने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या धम्माल याचा जागीच मृत्यू झाला. मृतकाचा मोठा भाऊ वाद सोडवण्यासाठी गेला असता, दोघांच्या झटापटीत त्याच्या उजव्या हातावर चाकूचा वार लागल्याने तो जखमी झाला. दरम्यान, ही घटना गावकऱ्यांना कळल्यावर, एका जमावाने दीपकराज डोंगरे याच्यावर हल्ला चढविला. जमावाने त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत आरोपी दीपकराज डोंगरे हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात भरती केले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. आरोपी दीपकराज डोंगरे जिल्हा परिषद अंतर्गत केंद्रप्रमुख असून ॲक्शन फोर्स शिक्षक संघटनेचा राज्याचा अध्यक्ष व प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा संचालक आहे.
प्रेम प्रकरणातून हत्या केल्याचा संशय
मृतक धम्माल आटोटे हा सामाजिक कार्यकर्ता असल्याने काही वर्षांपूर्वी दीपकराज डोंगरे व धम्माल एकत्र आले. त्यांचे एकमेकांच्या घरी येणेजाणे होते. दीपकराज याला मुलगी व धम्मालदरम्यान काहीतरी सुरू असल्याचा संशय आला. यातूनच त्याने धम्मालचा काटा काढण्याचे षडयंत्र रचले. प्रेम प्रकरणातून माझ्या भावाची हत्या केल्याचा आरोप मृतकाचा भाऊ विनोद आटोटे यांनी ग्रामीण पोलीस दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
फोटो:
सदर घटना ही प्रेम प्रकरणातून झाल्याची तक्रार आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास चालू असून तपासात ज्या अनेक गोष्टींचा उलगडा होईल. गावात शांतता राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
-रहीम शेख, ठाणेदार ग्रामीण पोलीस स्टेशन मूर्तिजापूर
शिक्षण क्षेत्रात खळबळ
दीपकराज डोंगरे हा शिक्षक नेता होता. यासोबतच जिल्हा परिषदेंतर्गत शाळांचा केंद्रप्रमुख म्हणूनही कार्यरत होता. अकोल्यातील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा संचालकसुद्धा होता. दीपकराज डोंगरे असे काही करेल, याची पुसटशी कल्पनादेखील कोणी केली नव्हती.