लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : शहरातील मंगळवार बाजार परिसरात एका अज्ञात भामट्याने व्यापार्यांना १५ हजार रुपयांनी गंडा घातल्याची घटना २१ डिसेंबर रोजी घडली.
भामट्याने व्यापारी आणि लहान विक्रेत्यांना विश्वासात घेऊन त्यांचेकडून किराणा माल व नगदी रुपये घेतले. काही वेळाने माझा माणूस बँकेतून रोकड घेऊन येत आहे, अशी बतावणी करून नगदी घेतलेले १0 ते १५ हजार रुपये घेऊन पसार झाला आणि गाडी व माल तेथेच सोडून दिला. एका अज्ञात व्यक्तीने अकोला शहरातून २७00 रुपये भाड्याने मालवाहू वाहन घेऊन मंगळवार बाजार स्टेशन विभाग मूर्तिजापूर गाठले. तेथे आल्यावर परिसरात असलेल्या किराणा व्यापारी, भाजी व फळ विक्रेता यांना विश्वासात घेऊन जवळच रेल्वेचे भले मोठे काम सुरू आहे. तेथील मजुरांकरिता किराणा पाहिजे असल्याची बतावणी केली. तसेच दोन तीन किरणा दुकानातून त्याने ६0 ते ७0 हजार रुपयांचा किराणा माल घेऊन भाड्याने आणलेल्या वाकोडे नामक व्यक्तीच्या गाडीत भरला.त्यानंतर त्याने आपला मोर्चा इतर लहान सहान भाजी व फळ विक्रेते यांचेकडे वळवून अनेकांजवळून हजार, दोन हजार, पाचशे असे उसने स्वरुपात गोळा केले. माझा माणूस बँकेत गेला आहे आणि रोकड घेऊन आल्यावर सर्वांचे पैसे परत देतो. माझी गाडी मालाने उभी आहे असे म्हणून दहा ते १५ हजार रुपये गोळा करून सदर अज्ञात व्यक्ती येतो म्हणून गेला तो परत न आलाच नाही. ज्यांच्याकडून त्याने किराणा माल घेतला त्या व्यापार्यांनी आपला माल गाडीतून परत उतरून घेतला. मात्र ज्यांच्याकडून त्या अज्ञात भामट्याने नगदी रुपये घेतले त्यांना जबर फटका बसला आहे. विशेष म्हणजे जे गाडी त्याने अकोला येथून भाड्याने आणली होती त्या गाडीच्या चालकाजवळूनही त्याने २५00 रुपये उसने घेतल्याची माहिती चालकाने दिली आहे.या प्रकरणी वृत्त लिहीस्तोवर व्यापार्यांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती.