मूर्तिजापूर : तालुक्यात गत तीन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील नद्या-नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे नदीकाठच्या शिवारात पाणी शिरल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे तसेच तालुक्यात अनेक गावांतील घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त गावांचा सर्व्हे करून तत्काळ भरपाई देण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागिय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, नदीकाठच्या शिवारात, गावामधे पाणी शिरल्यामुळे पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकटामुळे हतबल असतानाच शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करुन, बँकेचे कर्ज काढून पेरणी केली. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. सद्या शेतकऱ्यांची पिके घरात येण्याची वेळ असतानाच अस्मानी संकटामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त गावांचा तत्काळ सर्व्हे व पंचनामा करण्याचा आदेश देऊन आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना यांची उपस्थिती
निवेदन आ. हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, भाजप शहराध्यक्ष रितेश सबाकजर, कमलाकर गावंडे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष पप्पू पाटील मुळे, राजेंद्र इंगोले, विजय डोईफोडे, धनंजय ढोक, संदीप जळमकर, अमोल पिंपळे, साहेबराव राऊत, कुलदीप सदार, नीलेश वानखडे, विशाल सिंहे, मधुकरराव अव्वलवार, मंगेश पाचडे, गणेश ढाकरे, पद्माकर पाचडे, राजाभाऊ देशमुख, डॉ. वडुरकर, दिग्विजय गाडेकर, पवन भटकर, संतोष तळेकर, प्रमोद टाले, अभय पांडे, अर्पित गावंडे, अतुल टाले, अतुल इंगोले, योगेश फुरसुले, गणेश ठाकरे, ज्ञानेश महामुने यांची तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.