मूर्तिजापूर : ५ एप्रिलच्या रात्री पासून मिनी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पार फज्जा उडाला आहे. लॉकडाऊन संदर्भात व्यापारी संभ्रमात असल्याने खुल्लम खुल्ला व्यवहार केल्याचे चित्र पहायला मिळाले. शहरात अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने उघडी होती, काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानाचे अर्धशटर उघडे ठेवून व्यवहार केला तर काहींची पूर्ण दुकाने उघडी दिसून आली. या संदर्भात दुकानदारांना विचारणा केली असता आम्हाला कुठलाही आदेश प्राप्त झाला नसल्याने आम्ही दुकाने उघडली असल्याचे त्यांनी सांगितले, यात रेडीमेड गारमेंट, चप्पल दुकान, कपड्यांची दुकाने, मोबाईल दुकाने यासह बहूतेक दुकाने, बार रेस्टॉरंट उघडी दिसून आली. त्याच बरोबर स्टेशन विभाग भरवणारा मंगळवार आठवडी बाजारही भरल्याने तिथे नागरीकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याने लॉकडाऊन आहे की नाही हे सामान्य नागरीकांना समजने कठीण होते. परीणामी शहरात लॉकडाऊनचा कुठलाही परीणाम न होता या कालावधीत नागरीकांची गर्दी दिसून आली. लॉकडाऊन पाळण्यासाठी यात खऱ्या अर्थाने प्रशासकीय यंत्रणा खुजी ठरल्याची चर्चा शहरात होती महामार्गावरील बार बिनबोभाट सूरू
३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कुठलेही दुकान सुरु राहणार नाही असे निर्देशित केले असताना राष्ट्रीय महामार्गावर असलेले हॉटेल आणि बार तळीरामांनी तुडूंब भरलेले आढळून आले मंगळवार बाजाराचा दिवस असल्याने यात शासकीय कर्मचाऱ्यांचा भरणा अधिक दिसून आला. बाजाराचा दिवस असल्याने बेवड्यांनी लाखों रुपयांची दारु रिचवली.