यापूर्वी पंचायत समिती गणासाठी (सर्व राखीव) लाखपुरी नामाप्र महिला, माना नामाप्र, कानडी नामाप्र महिला, ब्रम्ही नामाप्र राखीव करण्यात आले होते. मंगळवारी झालेल्या आरक्षणाने नवख्या उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
यापूर्वी माना गणातून बाबाराव घुरडे, लाखपुरी गणातून मीनल नवघरे, कानडी गणातून पुष्पा इंगळे यांनी बाजी मारली होती. ब्रह्मी गणातून विद्यमान उपसभापती शिवसेनेचे सुभाष राऊत निवडून आले होते; परंतु ती जागा आता सर्वसाधारण स्त्री अशी राखीव झाल्याने उपसभापती सुभाष राऊत यांची संधी हुकली आहे. केवळ लाखपुरी सर्वसाधारण महिला राखीवचे आरक्षण निघाल्याने, मीनल नवघरे यांना पुन्हा संधी प्राप्त झाली असली तरी, पक्ष त्यांना पुन्हा संधी देतो काय, हा प्रश्न आहे. लाखपुरी सर्वसाधारण स्त्री, ब्रह्मी सर्वसाधारण स्त्री कानडी सर्वसाधारण, माना सर्वसाधारण असे नवीन आरक्षण असल्याने नवख्या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जिल्हा परिषद विद्यमान सदस्यांना संधी
यापूर्वी लाखपुरी जिल्हा परिषद गट ओबीसी पुरुषांसाठी राखीव; तर बपोरी ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. या आरक्षणात लाखपुरी सर्वसाधारण व बपोरी सर्वसाधारण स्त्री राखीव आला आहे. यामुळे लाखपुरी गटाचे प्रतिनिधित्व करीत असलेले अप्पू तिडके व बपोरी गटाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या मायाताई कावरे यांना पुन्हा संधी चालून आली असल्याने तूर्तास जीव भांड्यात पडला आहे.