लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : मौजे उनखेड, कासारखेड, रंभापूर, सुलतानपूर आणि जामठी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी विविध मागण्यांची पूर्तता न झाल्याने वाई प्रकल्पाचे काम ५ जानेवारीपासून पूर्णपणे बंद पाडले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी १२ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.मूर्तिजापूर तालुक्यातील वाई संग्राहक प्रकल्पांतर्गत सन २0११-१२ मध्ये झालेल्या सरळ सेवा पद्धतीने जी जमिनीची खरेदी करण्यात आली, त्याचा मोबदला अजूनही मिळाला नाही. मौजे उनखेडचे पुनर्वसन करण्यात यावे, प्रकल्प बाधित शेतकर्यांना प्रकल्पग्रस्तास तत्काळ शासकीय सेवेत समाविष्ट करून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे, उर्वरित जमिनीसाठी कायमस्वरूपी पक्के शेतरस्ते करून देण्यात यावे, लेआउट भीतीचे पक्के बांधकाम करून देण्यात यावे, शासकीय अधिकार्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या उर्वरित जमिनीची मोजणी करून देण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी वाई प्रकल्पाचे काम ५ जानेवारी २0१८ पासून बंद पाडले आहे.सन २0११-१२ मध्ये अधिकार्यांनी दिशाभूल करून सरळ खरेदी पद्धतीने लाखो रुपये किमतीची जमीन कवडीमोल भावात खरेदी करून घेऊन वाढीव रकमेसाठी अपील करायची असेल, तर तुम्ही बिनधास्त करू शकाल, अशा भुलथापा देऊन खरेदीवर स्वाक्षरी घेण्यात आल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी निवेदनात केला आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कवडीमोल भावात जमिनी बळकावल्यामुळे उदरनिर्वाहासाठी आमच्याकडे कोणताच पर्याय उरला नाही. म्हणून गावात राहून काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून उनखेडचे पुनर्वसन करावे. १४ जून २0१३ रोजी उमा नदीच्या पुरामुळे सर्व गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. कार्यकारी अभियंता लोळे, उपजिल्हाधिकारी प.दे.कृ.वि. भूसंपादन अधिकारी शेगावकर, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, इतर अधिकार्यांनी उनखेड येथे सभा घेऊन उनखेड, सुलतानपूर, रंभापूर, कासारखेड, वाईच्या गावकर्यांना प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र घ्या, पाच लाख रुपये किंवा २0 वर्षांपर्यंत दोन हजार मासिक पेन्शन घ्या, असे सांगितले. गावकर्यांचा प्रकल्पासाठी कोणताच विरोध नाही. तेव्हा आमच्या मागण्या त्वरित पूर्ण करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कार्यकारी अभियंता लघू पाटबंधारे विभाग अकोला यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
हरीश पिंपळेंनी बोलावली बैठक वाई प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी तसेच प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आमदार हरीश पिंपळे यांनी १८ फेब्रुवारी रोजी प्रकल्प अधिकारी, विभागीय अधिकारी मूर्तिजापूर आणि तहसीलदारांची बैठक उनखेड येथे बोलावली आहे. या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींचाही समावेश राहणार आहे.