- सचिन राऊत
अकोला - मुंबई, पुण्यातील क्लबला लाजविणारा मोठा जुगार क्लब मूर्तिजापूर पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने कारवाई केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर प्रचंड संतापले असून, त्यांनी मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे व गुन्हे शोध पथकाला पेशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिल्याची खात्रीलायक माहिती आहे.मूर्तिजापूर एमआयडीसीत सुरूअसलेल्या हायफाय क्लबच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पर्दाफाश केला होता. त्यानंतर या ठिकाणावरून बँक मॅनेजर, नगरसेवक, नगरसेवक पुत्र, उद्योजक, व्यावसायिक यांना अटक करण्यात आली होती. या बड्या आरोपींना न्यायालयात हजर करण्याऐवजी मूर्तिजापूर पोलिसांनी त्यांना टेबलवर जामीन देऊन संशयास्पद भूमिका उघड केली. मोठ्या क्लबकडे ‘अर्थ’पूर्ण डोळेझाक व आरोपींना तातडीने जामीन दिल्याने मूर्तिजापूर पोलिसांचा हा प्रताप पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांच्या रडारवर आला. त्यामुळे या परिसरात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील अवैध धंद्यांमुळे पोलीस अधीक्षक प्रचंड संतापले. त्यानंतर मूर्तिजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे व गुन्हे शोध पथकाची चांगलीच कानउघाडणी करून त्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या दोन अधिकाºयांसह गुन्हे शोध पथकाला सोमवारीच हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते; मात्र पोलीस बंदोबस्त व जननीसारख्या कार्यक्रमामुळे त्यांना येत्या दोन ते तीन दिवसात पोलीस अधीक्षकांसमोर हजर राहण्याचे सांगण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. मूर्तिजापूर शहरात गुटख्याची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री सुरु असून, मोठे क्लब व अवैध धंद्यासह दारुचा महापूर आला आहे. याकडे मूर्तिजापूर पोलिसांचे प्रचंड दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी त्यांना तातडीने हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेत ७० च्या जवळपास अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. तर विशेष पथकात १० कर्मचारी कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाºयांची संख्या असताना मूर्तिजापूर, अकोट, बाळापूर, पातूर, हिवरखेड, तेल्हारा, बोरगाव मंजु, बार्शीटाकळी यांसारख्या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर विशेष पथकाकडूनच कारवाई करण्यात येत आहे. त्या तुलनेत ६० पेक्षा अधिक संख्या असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मात्र या ठिकाणावर बोटावर मोजण्याइतक्याही कारवाया नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘अवचार’ प्रचंड अवतार दाखवीत असून, बार्शीटाकळीसह तालुक्याच्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात ‘माया’ गोळा करीत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.