औषधी दुकाने, दवाखाने आणि डेअरी वगळता इतर सर्व आस्थापना व दुकाने बंद राहिली. उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी केलेल्या आवाहनाला व्यावसायिक व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा नव्या स्ट्रेनचा कहर असेल, तर त्याच्याशी निकराचा लढा द्यावा लागेल, असा आरोग्यतज्ज्ञांच्या निरीक्षणाचा निष्कर्ष असून मास्कचा सातत्यपूर्ण व स्वयंस्फूर्त वापर आणि गर्दीपासून दूर राहणे, ही या लढ्यातील सर्वात प्रभावी शस्त्रे असतील, असा त्यांचा विश्वास आहे. दरम्यान, कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी अमरावती विभागात सुधारित निर्देश दिले आहेत. त्यानुसार दुकाने, आस्थापना सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान सुरू राहतील. शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत संचारबंदी असेल. अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयांमध्ये १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापेक्षा अधिक असेल तेवढ्या संख्येत कर्मचारी उपस्थित रहातील. हॉटेल्स, उपाहारगृहातून फक्त पार्सल सुविधा उपलब्ध राहील. शाळा, महाविद्यालये, शिकवणीवर्ग, सिनेमागृह, व्यायामशाळा, उद्याने बंद रहातील. सर्व प्रकारचे कार्यक्रम, उत्सव बंद राहतील, वाहतुकीवर निर्बध असणार नाहीत. प्रवासी संख्येवर मात्र निर्बंध असतील, असे १ मार्चपर्यंत लागू असलेल्या या निर्देश नियमावलीत म्हटले आहे.