मूर्तिजापूर : गत दहा वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठा योजना थंड बस्त्यात पडून असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या शहराला दर दहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. याकडे लक्ष देऊन योजनेचे काम पूर्ण करण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
शहरातील गोयनकानगर येथे असलेल्या पंप हाऊस येथून पाणीपुरवठा केला जातो. शहर हे दोन विभागात असल्याने प्रथम स्टेशन विभाग व त्यानंतर जुनी वस्तीत प्रभागनिहाय पाणीपुरवठा केला जातो. जीवन प्राधिकरणाने सन २०१० मध्ये २६ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. दहा वर्ष लोटूनही सन २०२१ पर्यंत योजनेचे काम पूर्ण झाले नाही. योजना तब्बल २६ कोटी रुपयांची असून, त्यापैकी १२ कोटी रुपयांचे काम जीवन प्राधिकरणाने केले. केलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी आदेश दिल्यावर ३ कि.मी.चे काम करण्यात आले; परंतु खोदकाम करून त्यावर कॉंक्रिटीकरण करण्यात आले नाही. ते तत्काळ पूर्ण करण्यात यावे. प्रभाग क्र.६ मध्ये झोन करण्याचे काम अपूर्ण आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दि. २४ जून २०२० रोजी काम सुरू करण्याचे आदेश देऊनही काम अद्याप अपूर्ण आहे. तरी कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कंत्राटदार, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रति विभागीय आयुक्त अमरावती व आमदार गोपीकिशन बाजोरिया अकोला, जिल्हाधिकारी अकोला यांनाही देण्यात आल्या आहेत.
----------------------------------------------------
लाखो लिटर पाण्याचा अपव्यय!
खांबोरा-मूर्तिजापूर जलवाहिनीवर अनेक ठिकाणी लिकेज असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे लिकेजची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मूर्तीजापूर शहरातील गोयनका नगरात घरासमोर मोठे लिकेज आहे. या बाजूलाच पाण्याचे जलकुंभ असून, त्यामधून ४ ते ५ लाख लिटर शुद्ध केलेले पाणी नाल्यात वाहून जात असल्याचे चित्र आहे.