अतुल जयस्वाल अकोला : पाश्चात्त्य संगीताचा बोलबाला असलेल्या सध्याच्या काळात सनई-चौघडा या खास भारतीय पारंपरिक वाद्याची कला जोपासणारे कलाकार बोटावर मोजण्याएवढे राहिले आहेत. अकोला जिल्ह्यातील मोरगाव-सादीजन (ता. बाळापूर) या छोट्याशा गावातील नावकार बंधू हे त्यापैकी एक आहेत. नावकार घराण्याची तीन पिढ्यांपासूनची परंपरा हे बंधू जोपासत आहेत.सनईचे पवित्र व धीरगंभीर स्वर घुमले की वातावरण मंगलमय होऊन जाते. त्यामुळेच लग्न, वाढदिवस, गृहप्रवेश किंवा कोणताही मंगल प्रसंग असो, सनई-चौघडा या मंगलवाद्याच्या निनादाशिवाय तो अपूर्ण वाटतो.मोरगाव-सादीजन येथील बळीराम भिवाजी नावकार, राजाराम भिवाजी नावकार, श्रीराम झिंगाजी नावकार, शांताराम झिंगाजी नावकार हे बंधू गत ३५ वर्षांपासून सनई-चौघडा वाजवितात.त्यांनी आतापर्यंत नागपूर, वर्धा, चंद्रपूर, इंदूर, नांदेड, अमरावती, बुलडाणा या ठिकाणी लग्नसोहळ्यांमध्ये सनई-चौघड्यांमध्ये आपली कला सादर केली आहे. अलीकडच्या काळात या मंगलवाद्याकडे समाजाचे दुर्लक्ष होत असल्याचे नावकार बंधू सांगतात.नावकार बंधूंनी जोपासलेला हा वसा पुढील पिढीलाही आदर्श ठरणारा आहे़ प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी हे वाद्य सोडलेले नाही़ त्यामुळे नावकार बंधूंचे सर्व स्तरांतून कौतुक होते़अल्पशा मानधनावर गुजराणकुठे सनई-चौघड्याची आॅर्डर मिळाली, तरी त्यापोटी मिळणारे मानधन हेअत्यल्प असते. एका लग्नसोहळ्यासाठी ३ ते ४ हजार रुपयांचे मानधन मिळते.
तीन पिढ्यांची संगीत साधना
By atul.jaiswal | Published: January 15, 2018 2:40 AM