- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदी फिल्म इंडस्ट्रिजमध्ये काम केलेला एक कलावंत अकोल्यात येतो. आपल्या कलेने अकोलेकरांची मने जिंकतो. अनेक शागिर्द घडवतो. एवढेच नाही तर विदर्भात सर्वप्रथम आर्केस्टाची परंपरा, आर्केस्ट्राची ओळख रसिकांना करून देतो. या कलावंताला जुन्या पिढीतील सर्वच लोक ओळखतात. या कलावंताचे नाव आहे, समरेंद्रनाथ चॅटर्जी. स्वातंत्र्यानंतर शहरवासियांच्या मनात याच कलावंताने राष्ट्रगिताचे बोल जागविले. राष्ट्रगिताची चाल रसिकांना शिकविली. या स्मृतीना ३० डिसेंबर रोजी अकोल्यात त्यांच्या कुटूंबीयांनी संगीत रजनीच्या निमित्ताने घेऊन उजाळा दिला.काळाच्या ओघात समरेंद्रनाथ यांचा नव्या पिढीला विसर पडला. एवढा मोठा कलावंत, संगीतकार अकोल्यात घडला. अकोला शहराला संगीत क्षेत्रात ओळख मिळवून दिली, अशा थोर कलावंताचे रसिकांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मरण व्हावे, यासाठी लोकमतने त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. समरेंद्रनाथ हे मूळचे बंगालचे. गायक, वादक, नृत्य क्षेत्रात त्यांचे नाव. मुंबईला गायक मन्ना डे, पंडित उदयशंकर यांच्यासह त्यांनी अनेक संगीतकारांसोबत काम केले. सावतराम मिलचे मालक राधाकिसन गोयनका हे मुंबईला गेले होते. तेथे त्यांची सुमरेंद्रनाथ चॅटर्जी यांच्यासोबत ओळख झाली आणि गोयनका यांनी त्यांना अकोल्यात येण्याविषयी विनंती केली. १९४४ मध्ये सुमरेंद्रनाथ हे अकोल्यात आले. सावतराम मिलमध्ये कामगार म्हणून काम करीत त्यांनी येथील विद्यार्थ्यांना विविध वाद्ये, वादन, शास्त्रीय, सुगम गायन आणि नृत्य शिकविले. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर राष्ट्रगिताविषयी फारसी कोणालाही माहिती नव्हती. असली तरी राष्ट्रगीत कसे गावे, हे माहिती नव्हते. त्यामुळे राष्ट्रगिताची ओळख त्यांनीच करून दिली. विदर्भात त्यांनी अनेक वादक, गायकांना सोबत घेऊन पहिल्या आर्केस्ट्राची सुरुवात केली. संगीत केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक शागिर्द घडविले, मोठे केले; परंतु हा कलावंत आयुष्याच्या अखेरपर्यंत शिवचरणपेठेतील भाड्याच्याच घरात राहिला आणि त्याच घरात २२ डिसेंबर १९७८ रोजी अंतिम श्वास घेतला. समरेंद्र चॅटर्जी यांना सपन, चंदन आणि रिमा ही तीन मुले आहेत. सध्या ही मुले उत्तर प्रदेशातील अलीगड येथे स्थायिक झाली असून, समरेंद्रनाथ यांचा संगीताचा वारसा ही तीनही मुले जपत आहेत. अकोल्यात समरेंद्रनाथ यांच्यासारखा मोठा कलावंत होऊन गेला. त्यांच्या शागिर्दांनी त्यांच्या आठवणी अजूनही जपून ठेवल्या असून, दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे हे शागिर्द, शिष्य आयोजन करतात.मुलगा चंदनचा ३८ तास तबला वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड!समरेंद्रनाथ चॅटर्जी यांचा लहान मुलगा चंदन यांनासुद्धा संगीताची आवड आहे. अलीगड येथे कॉन्व्हेंट आणि संगीत केंद्र चालवितात. काही वर्षांपूर्वी त्यांनी सतत ३६ तास तबला वादन करून गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्यांचे मोठे बंधु सपन चॅटर्जी हे रेल्वे विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या भगिनी रिमा चॅटर्जी यासुद्धा अलीगडमध्ये नृत्य कला केंद्र चालवितात. समरेंद्रनाथ चॅटर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त चॅटर्जी कुटुंब सध्या अकोल्यात आले आहे.
अकोल्यातील संगीतकाराने सुरू केली विदर्भात ऑर्केस्ट्राची परंपरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:19 PM