लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: काँग्रेस, कम्युनिस्ट नेते सीएए, एनआरसीला विरोध करून जाती, धर्मांमध्ये विद्वेष निर्माण करीत आहेत. मुस्लीम समुदायाला भडकाविण्याचे काम करण्यात येत आहे. मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व देण्याचे, देशाबाहेर काढण्यासारखे चुकीचे संदेश काँग्रेसकडून पसरविल्या जात आहेत. सीएए कायदा व एनआरसीमुळे मुस्लिमांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नाही, असे मत सीएए कायद्याचे अभ्यासक व नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी येथे व्यक्त केले.राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीने सीएए, एनआरसीच्या समर्थनार्थ रविवारी मुंगीलाल बाजोरिया प्रांगण ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या विशाल रॅलीचा समारोप करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अॅड. संजय धोत्रे, माजी राज्यमंत्री व आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, लक्ष्मीनारायण दायमा महाराज, रा.स्व. संघाचे विभाग संघचालक प्रा. नरेंद्र देशपांडे, महापौर अर्चना मसने, माजी महापौर विजय अग्रवाल, डॉ.नानासाहेब चौधरी, शशांक जोशी, समीर थोटगे, निशिकांत देशपांडे, प्रा. विवेक बिडवई आदी होते.दयाशंकर तिवारी म्हणाले की, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यांक समुदायावर अत्याचार झाले. पाकिस्तानमधील हिंदू, शीख समुदायाचा प्रचंड छळ करण्यात आला. त्यांचे धर्मांतर करण्यात आले; परंतु भारतात अल्पसंख्यांक सुरक्षित आहेत. आम्ही राष्ट्रासोबत उभे राहणारे लोक आहोत. राष्ट्राच्या नावाने राजकारण करणारे नाहीत. या तीन देशांमधील अल्पसंख्यांक धर्माच्या लोकांना भारत नागरिकत्व देण्यास तयार आहे, असे सांगत, तिवारी यांनी अतिथी देवो भव: ही आमची संस्कृती आहे. आम्ही पारसी, पोर्तुगिजांना आश्रय दिला. बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना आश्रय दिला. आदराने जो येईल त्याचा आम्ही सन्मान करू; परंतु जो आमच्या पाठीत खंजीर खुपसेल, त्याला जागा दाखवू. काँग्रेस, कम्युनिस्ट नेते सीएए, एनआरसीचे राजकारण करून मुस्लीम समुदायाची दिशाभूल करीत आहे. सीएए, एनआरसीमुळे मुस्लीम बांधवांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नाही. त्यामुळे मुस्लीम बांधवांनी चिंता करू नये, असे स्पष्ट करीत, तिवारी म्हणाले की, सीएए कायदा हा अडीच वर्षांच्या चर्चेनंतर संसदीय समितीने मंजूर केला आणि विधेयक संसदेत मांडले. या संसदीय समितीमध्ये सर्वच पक्षांचे नेते होते. त्यावेळी त्यांनी विरोध केला नाही आणि आता जात, धर्माचे राजकारण करण्यासाठी सीएए, एनआरसी कायद्याला विरोध करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. सभेचे संचालन सिद्धार्थ शर्मा यांनी केले. राष्ट्रगितानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.