अकोला : वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीद्वारा आयोजित पुण्यतिथी महोत्सवाची रविवारी, २८ डिसेंबर रोजी उत्साहात सांगता झाली. हजारोंच्या संख्येने जमलेल्या गुरुदेवभक्तांनी यावेळी राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथिनिमित्त स्वराज्य भवनाच्या प्रांगणात सुरू असलेल्या पुण्यतिथी महोत्सवात राष्ट्रीय भजन संमेलन, महिला संमेलन, युवक संमेलन तसेच योग प्रात्यक्षिकांसह राष्ट्रसंताची भजने आणि कीर्तन आदींचा लाभ गुरुदेवभक्तांनी घेतला. सकाळी ९ वाजता भजन संमेलनात विविध ठिकाणांहून आलेल्या बाल भजनी मंडळींनी भजने सादर केली. त्यानंतर १२ वाजता आकोट येथील ग्रामगीताचार्य श्रीकृष्ण सावळे गुरुजी यांनी राष्ट्रीय प्रबोधन सादर केले. दुपारी ४ वाजता युवक संमेलन आणि मलखांब प्रात्यक्षिके पार पडली. सायंकाळी ६ वाजता हजारो गुरुदेवभक्तांच्या उपस्थितीत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांची भजने झाली. यानंतर आरती, प्रतिज्ञा, वैदिक प्रार्थना आणि सर्वधर्म प्रार्थना पार पडली. यावेळी मंचावर उपस्थित ख्रिश्चन, शिख, वौद्ध, जन्ौ आणि मुस्लिम धर्मगुरूंनी प्रार्थना म्हटली. 'मंगल नाम तुम्हारा' या प्रार्थनेने महोत्सवाची सांगता झाली.
गुरुदेवभाक्तांची राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली
By admin | Published: December 29, 2014 1:47 AM