अकोला : वडद येथील २0 माकडांचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबतचे गूढ कायम आहे. शेतातील प्रक्रिया केलेले बियाणे किंवा थिमेटचे सेवन केल्यामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज डॉक्टर तसेच वनविभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच माकडांच्या मृत्यूमागील नेमके कारण समजणार आहे. जिल्ह्यातील वडद येथे शनिवारी २0 माकडांचा मृत्यू झाला. हा मृत्यू झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच वन्य जीवप्रेमींनी त्या ठिकाणी धाव घेतली. सर्पमित्र शेख मोहम्मद ऊर्फ मुन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात माकडांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिल्यावर वनविभागाचे पथक व काही वन्य जीवप्रेमी त्या ठिकाणी गेले. शेतामध्ये मृत माकडे पडलेली होती. तसेच काही झाडांवरही माकडांचे मृतदेह होते. शेतात सध्या विविध बियाण्यांची पेरणी करण्यात आली आहे. अनेक प्रकारच्या बियाण्यांवर प्रक्रिया करण्यात येते. हे बियाणे या माकडांनी सेवन केले असावे, त्यातून त्यांना विषबाधा झाली असेल किंवा अनेक शेतकरी शेतात थिमेट टाकतात. त्यामुळे थिमेटचे सेवन केल्याने या माकडांचा मृत्यू झाला असेल, असा अंदाज पशुधन विकास अधिकारी तसेच वनविभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
माकडांच्या मृत्यूचे गूढ कायम!
By admin | Published: July 06, 2015 1:26 AM