अकोला : जिल्हा परिषदेच्या चार सभापतींची निवड उद्या होत असताना बुधवारी रात्री उशिरापर्यंतही भाजपने भूमिका स्पष्ट केली नाही. उद्या सकाळी पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी सांगितले. त्यामुळे सभागृहात उद्या सभापती निवडीच्या दरम्यान भारिप-बहुजन महासंघाच्या उमेदवारांना महाविकास आघाडीशी लढत द्यावी लागण्याची चिन्हे आहेत. त्याचवेळी भाजपची भूमिका काय असेल, त्या रहस्यमय घडामोडींतूनच सभापतींची निवड होणार आहे.जिल्हा परिषदेच्या सभापती पदांची निवड उद्या गुरूवारी होत आहे. ती निवड करण्यासाठी सभागृहात बहुमत लागणार आहे. निवड होण्याएवढा बहुमताचा आकडा कोणत्याही पक्षाकडे नाही. भारिप-बमसंचे संख्याबळ २५ वर थांबले आहे. तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-अपक्षाचे संख्याबळ २१ आहे. या महाविकास आघाडीने भारिप-बमसंला सत्तेपासून रोखण्याचे जोरदार प्रयत्न केले. अध्यक्ष,उपाध्यक्षपदाच्यानिवडीच्या वेळी भाजपसह मोट बांधण्याचाही प्रयत्न केला. मात्र, भाजपच्या सात सदस्यांनी सभागृहात हजेरी नोंदवून बहिर्गमन केले. त्यामुळे भारिप-बमसंच्या प्रतिभा भोजणे, सावित्री राठोड यांचा २५ विरूद्ध २१ मतांनी विजय झाला. आता चार सभापती पदांच्या निवडीसाठीही सभागृहात बहुमत लागणार आहे. भारिप-बमसंला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या महाविकास आघाडीकडे बहुमत नाही. मात्र, निवड प्रक्रीयेत उमेदवार लढत देणार असल्याचे ठरवण्यात आले. त्यामध्ये तीन घटक पक्षांना प्रत्येकी एक तर अपक्ष गजानन पुंडकर यांना एका सभापती पदासाठी रिंगणात उतरवले जाईल, असे शिवसेनेचे गटनेते गोपाल दातकर यांनी सांगितले. सभागृहात भारिप-बमसं विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार असली तरी भाजपच्या भूमिकेवर सर्व काही अवलंबून आहे.
- सांगताही येत नाही, सहनही होत नाही..सभागृहात शिवसेना किंवा काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करा, ही बाब भाजपच्या सदस्यांना सांगता येण्यासारखी नाही. त्याचवेळी भारिप-बमसंची सत्ता सहन करणेही कठिण आहे. जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपला मिळालेले संख्याबळ म्हणजे घ्यावी लागणाऱ्या भूमिकेबद्दल सांगताही येत नाही अन सहनही होत नाही, असेच आहे. त्यामुळेच या पक्षाने आधीच जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिल्याचे स्पष्ट केले आहे.
- समविचारी पक्ष सोबत येण्याची अपेक्षासभागृहात बहुमतासाठी समविचारी पक्ष सोबत येतील, ही अपेक्षा अखेरच्या क्षणापर्यंत आहे. ते न आल्यास भारिप-बमसंची एकला चलोरे ची भूमिका घेऊनच वाटचाल सुरू राहिल, असे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी सांगितले.
- महाविकास आघाडी कायम राहिलअध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी अस्तित्त्वात आलेली महाविकास आघाडी उद्या सभापती निवडीच्या वेळीही कायम राहणार आहे.