अकोला - रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पदरीत्या उभ्या कारमध्ये आढळलेल्या ३५ लाखांच्या रकमेचे गूढ १५ दिवस उलटल्यावरही कायम आहे. खरातच्या शोधानंतर त्याचा उलगडा होणार असला तरी रामदासपेठ पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी १५ डिसेंबरला रात्रभर शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविले होते. यादरम्यान प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धारदार शस्त्र जप्त करण्यात पोलिसांना यश आले; मात्र रामदासपेठ पोलिसांनी याच दरम्यान एका कारमधील तब्बल ३५ लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने ही रक्कम निवडणुकीसाठी आली असल्याचा संशय होता; मात्र सदरची रक्कम ही प्लॉट खरेदीची दाखविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित प्लॉटचे दस्तावज सादर करण्याचे आदेश दिले. दस्तावेज सादर करण्यात आल्यानंतरही पोलिसांचे समाधान न झाल्याने या रकमेसंदर्भात उलगडा अद्याप झालेला नाही. ज्या कारमधून ३५ लाख रुपये जप्त करण्यात आले होते, त्या कारमधील खरात नामक इसम पोलिसांना पाहून फरार झाला होता, तर इतर तीन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले; परंतु सदरची रक्कम कुणाची आहे, हे या तिघांना माहिती नसल्याने त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. फरार असलेल्या खरातकडेच या रकमेची माहिती असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
३५ लाखांचे गूढ कायम!
By admin | Published: December 29, 2015 2:22 AM