अकोला : अलीकडच्या काळात हौस म्हणून घरांमध्ये लव्हबर्ड पाळण्याचे प्रमाण वाढले आहे. पिंजऱ्यात ठेवलेली लव्हबर्डची जोडी अनेकांच्या घरात दिसून येते. परंतु, हे लव्हबर्डस सापांना घरात निमंत्रण देणारे ठरत असल्याचे अकोला शहरात सोमवार, ४ सप्टेंबर रोजी घडलेल्या दोन घटनांवरून दिसून येत आहे. लव्हबर्डसच्या शोधात दोन वेगवेगळ्या घरांमध्ये शिरलेल्या नाग व धामण जातीच्या सापास सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी पकडून कुटुंबियांना सुरक्षित केल्याची घटना सोमवारी घडली.
गीतानगर येथील एका व्यक्तीच्या घरात सोमवारी सकाळी धामण जातीचा मोठ्या सापाने प्रवेश केला. हा साप लव्हबर्ड असलेल्या दोन पिंजऱ्यांपैकी एका पिंजऱ्यात शिरला, परंतु तो पिंजरा रिकामा होता. तोपर्यंत घरमालकाच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी तातडीने बाळ काळणे यांना माहिती दिली. काळणे यांनी घटनास्थळ गाठून पिंजऱ्यात बसलेला धामण साप पकडला व सुरक्षित अधिवासात सोडून दिला. दुसऱ्या घटनेत सरकारी बगीचा परिसरातील एका व्यक्तीच्या घरात रात्री साडे नऊ वाजताचे सुमारास साडे पाच फुटाचा नाग शिरला. नाग लव्हबर्डच्या पिंजऱ्यापर्यंत गेला, परंतु त्याला पिंजऱ्यात प्रवेश करता आला नाही. त्यामुळे लव्हबर्डसचे प्राण वाचले. त्यानंतर नाग घरातील खिडकीत जाऊन बसला. घरमालकाने संपर्क साधल्यानंतर बाळ काळणे त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी नागाला पकडून सुरक्षित अधिवासात सोडून दिले.
सापाला भक्ष्याचा वास दुरुनच येतो. पक्ष्यांची अंडी, पिल्लांच्या वासाने साप घरात शिरू शकतात. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या घरात पाळलेले लव्हबर्डचे पिंजरे खिडकी, दरवाजांपासून दुर ठेवावेत. ग्रामीण भागातही कोंबडी व कबुतरांचे खुराडे हे घरांपासून दुर ठेवावे. घरात सापांचा वावर होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.- बाळ काळणे, सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक, अकोला