अकोटः नगर परिषद व नगरपंचायतमधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेकदा निवेदन देऊन व आंदोलन करूनही शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे १५ एप्रिल २०२१ रोजी राज्यासह अकोला जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ घुगे, राज्य उपाध्यक्ष दीपक रोडे, राज्य सचिव रामेश्वर वाघमारे, गजानन इंगळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रभर तीन टप्प्यातील आंदोलन करण्याचा निर्धार केला, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप रावणकार यांनी दिली.
यामध्ये एप्रिल व मेच्या दरम्यान तीन टप्प्यात आंदाेलन करण्यात येणार आहे. एक एप्रिल रोजी सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. १५ एप्रिल रोजी लेखणीबंद आंदोलन यशस्वी केले. यानंतरही शासनाला जाग आली नाही तर १ मे महाराष्ट्र दिनापासून अत्यावश्यक सेवेसह बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करणार आहे. आता निर्धार पक्का केला असून, आंदोलनातून माघार घेतली घेणार नाही, असा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला आहे. राज्यातील नगर परिषदांमध्ये रोजंदारी कर्मचा-यांचा विनाअट समावेशन करणे, सहायक अनुदानऐवजी शंभर टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोषागारामार्फत देणे, सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते रोखीने देणे, १० २०, ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करणे व इतर मागण्यांसाठी अकोला जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आज लेखणी बंद आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी केले. याकरिता जिल्हाध्यक्ष प्रदीप रावणकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शर्मा, रमेश गिरी, जिल्हा सचिव दीपक सुरवाडे, स्थानिक अध्यक्ष ईश्वरदास पवार (अकोट), भरत मल्लिये (तेल्हारा), नागोराव सुरजुसे (बाळापूर), शिरीष गांधी (मूर्तिजापूर), नबी खान (पातूर), रूपेश पिंजरकर (बार्शीटाकळी) यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत कर्मचारी संवर्ग, कर्मचारी सफाई कामगार या तीन टप्प्यात आंदोलनामध्ये सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्यात आले.