अकोला : पावसाळी हंगाम व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रवाशांना कोकणात व कोकणातील प्रवाशांना विदर्भात येण्या-जाण्यासाठी मध्य रेल्वेने बुधवार, २७ जुलैपासून नागपूर ते मडगावदरम्यान द्विसाप्ताहिक विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत या गाड्या चालविण्यात येणार असल्याने अकोलेकरांना थेट गोव्यासाठी गाडी उपलब्ध होणार आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ कार्यालयातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०११३९ नागपूर-मडगाव ही विशेष गाडी २७ जुलैपासून दर बुधवार व शनिवारी दुपारी १५.०५ सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी अर्थात गुरुवार व रविवारी मडगाव रेल्वेस्थानकावर सायंकाळी १७.३० वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ०११४० मडगाव- नागपूर ही विशेष गाडी २८ जुलैपासून दर गुरुवार व रविवारी मडगाव स्थानकावरून २१.३० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवार व सोमवारी नागपूर स्थानकावर पोहोचणार आहे.
या गाड्यांना वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी स्थानकांवर थांबा असणार आहे.
या गाडीला एकूण २२ डबे असून, द्वितीय वातानुकूलित १, तृतीय वातानुकूलित ४, शयनयान ११, सेकंड सिटिंग ४, एसएलआर २ अशी संरचना आहे.
कायमस्वरूपी करण्याची मागणी
विदर्भातील प्रवाशांना थेट गोव्याला पोहोचविणारी ही विशेष गाडी कायमस्वरूपी करण्याची मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना सरचिटणीस वैभव बहुतुले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार संजय धोत्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.