अकोला : महानगरपालिका प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेली शहरातील नालेसफाईची कामे महासभेच्या मंजुरीअभावी थांबविण्यात आली असल्याने शहरातील १५२ नाल्यांपैकी केवळ ३२ नाल्यांची सफाई करण्यात आली. त्याअनुषंगाने महानगरपालिकेच्या कारभारात नाले सफाईची कामे अडकल्याने अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात शहरातील अनेक घरांमध्ये पाणी घुसले असून, नुकसानीचा सामना अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना करावा लागला.
अकोला शहरात लहान-मोठे १५२ नाले असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी या नाल्यांची सफाई करण्याचे काम मनपा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले होते. परंतु मनपाच्या महासभेची मंजुरी नसल्याने सुरू करण्यात आलेली नाले सफाईची कामे थांबविण्यात आली. त्यामुळे नाले सफाईच्या कामांचा प्रस्ताव मनपा प्रशासनामार्फत महासभेकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, मनपातील सत्तापक्षाकडून नाले सफाईच्या कामांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली नाही. नाले सफाईची कामे थांबविण्यात आल्याने, शहरातील १५२ पैकी केवळ ३२ नाल्यांच्या सफाईची कामे करण्यात आली असून, उर्वरित १२० नाले सफाईची कामे अद्यापही प्रलंबित आहेत. दरम्यान, जिल्हयात २१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत अकोला शहरातील विविध भागांत अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या कारभारात नाल्यांची सफाई अडकल्याने शहरातील विविध भागात घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना नुकसानीचा सामना कराव लागला.
८० लाखांचा प्रस्ताव; खर्च केवळ २० लाख !
शहरातील नाले सफाईच्या कामांसाठी मनपा प्रशासनामार्फत ८० लाख रुपये निधी खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, नाले सफाईची कामे थांबविण्यात आल्याने, केवळ ३२ नाले सफाईच्या कामांवर २० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
मनपा आयुक्तांनी शहरातील नाले सफाईची कामे करण्यास ठेकेदारांना परवानगी दिली होती. त्यानुसार कामेदेखील सुरू झाली होती. नाले सफाईच्या कामांचा प्रस्ताव मनपा आयुक्तांमार्फत महासभेच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मात्र, या प्रस्तावाला मनपातील सत्तापक्षाकडून मान्यता देण्यात आली नाही. नालेसफाईची कामे थांबविण्यात आल्याने अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात शहरातील विविध भागात लोकांच्या घरांत पाणी घुसल्याने नुकसान झाले. त्याला मनपातील सत्ताधारी जबाबदार आहेत.
- साजीदखान पठाण, विरोधी पक्षनेता, महानगरपालिका.