बाळापूर : तालुक्यातील टाकळी खुरेशी येथे विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे.
------------------------
गंजलेल्या खांबांमुळे अपघाताची शक्यता
पातूर : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. हे खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे खांब बदलण्याची मागणी होत आहे. गंजलेल्या वीज खांबाजवळ मुले खेळत असतात. स्थानिक प्रशासनाने गंजलेले खांब बदलावे.
------------------
बोरगाव मंजू परिसरात पिके जाेमात
बोरगाव मंजू : अकोला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे सोयाबीनचे पीक जाेमात आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित आहेत. शेतशिवारात डवरणीचे काम सुरू आहे.
------------------
पाण्याचा अपव्यय, तोट्या बसविण्याची मागणी
खिरपुरी : टाकळी येथे सार्वजनिक ठिकाणी केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नळांना बऱ्याच ठिकाणी तोट्या नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी विनाकारण वाहून जात आहे. वाॅर्डांमध्ये होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तत्काळ तोट्या बसविण्यात याव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
------------------
अकोट येथे मुख्य रोडवर स्वच्छतेची गरज
अकोट : शहरातील मुख्य रोडवर अस्वच्छता पसरली असून, नगर परिषदेने स्वच्छता करण्याची मागणी होत आहे. रस्त्यावर घाण साचल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
-------------------------
स्वच्छतेच्या अभावामुळे आजाराला आमंत्रण
बार्शीटाकळी : शहरातील विविध ठिकाणी विखुरलेला उघड्यावरील कचरा रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे आजारांची शक्यता आणखी वाढत आहे. नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
-----------------------
जड वाहतुकीने रस्त्यांची दुरवस्था
हाता : रेती वाहतुकीच्या अवजड आणि ओव्हरलोड वाहनांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तालुक्यातील रेती घाटालगतच्या रस्त्यांची चाळणी झाली असून वाहनधारकांना त्रास होत आहे.
------------------
पोलीस कर्मचारी वसाहतीची दुरवस्था
पिंजर : पिंजर पोलीस ठाण्यातील पोलिसांची निवासस्थाने दुर्लक्षित आहेत. नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांना हक्काचे निवासस्थान नसल्याने या कर्मचाऱ्यांना गावात भाड्याचे घर करून राहावे लागते.
----------------------------------
बार्शीटाकळी येथे एक कोरोना पॉझिटिव्ह
बार्शीटाकळी : आज दिवसभरात तालुक्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कोरोनाचे संकट कायम असल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता नियमांचे पालन करण्याचे आवाहन होत आहे.
-------------------------
अकोला शहरात आणखी पाच पॉझिटिव्ह
अकोला : शहरात कोरोनाचा आलेख घसरला असून, संकट अद्याप कायम आहे. शुक्रवारी दिवसभरात शहरातील महानगरपालिका क्षेत्रात पाच जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
---------------
वाशिंबा येथे कोरोनामुळे एकाचा मृत्यू
अकोला : कोरोनामुळे शुक्रवार, १६ जुलै रोजी एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण वाशिंबा, बोरगाव मंजू येथील ५४ वर्षीय पुरुष असून, या रुग्णास १५ जुलै रोजी दाखल केले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.