अकोला : गोविंद रामानंद सर्मथ सद्गुरु प्रल्हाद महाराज रामदासी संस्थान, साखरखेर्डा यांच्यावतीने १८ ते २0 जुलै या कालावधीत खंडेलवाल भवन, अकोला येथे राम नामजप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने काकडा आरती, अभिषेक, अनुग्रह, अखंड नामस्मरण, कीर्तन, प्रवचन, उपासना, पंचपदी, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे संस्थानचे विश्वस्त सुरेश गावपांडे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. संस्थान मागील ३५ वर्षांपासून रामनामाच्या प्रसाराचे कार्य करीत आहे. प्रल्हाद महाराजांचे १0 लाखांच्यावर शिष्य संप्रदाय राज्यात व राज्याबाहेर आहे. सर्व समाजाला रामनाम, सदाचरण, सद्विचार, गुरुभक्ती, गोरगरिबांची सेवा, गोरक्षण, प्रत्येकाची आध्यात्मिक उन्नती या माध्यमातून प्रल्हाद महाराजांनी लोकोत्तर कार्य केले. या शिकवणीचा आदर्श घेऊन संस्थान कार्य करीत आहे. प्रल्हाद महाराजांचे अकोला शहरात बरेच वर्ष वास्तव्य होते. त्यांचे देहावसानदेखील अकोल्यातच झाले होते. महाराजांच्या कार्याची ओळख सर्वांंना व्हावी या दृष्टिकोनातून संस्थानने अकोला शहरात १८ ते २0 जुलैपर्यंंत नाम जप शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे गावपांडे यांनी सांगितले. शिबिराची सुरुवात १८ जुलैला होईल. सकाळी ८.३0 वाजता प्रल्हाद महाराजांच्या पादुका साखरखेर्डा येथून अकोला येथे आणण्यात येतील. सकाळी ९.३0 वाजता नामजप संकल्प, दुपारी १२ वाजता महापूजा, नैवेद्य आरती व प्रसाद, दुपारी ३ वाजता रामदासपंत आचार्य, जालना यांचे महाराजांच्या चरित्रावर व्याख्यान, सायंकाळी ५.३0 वाजता हभप निटुरकर महाराज हैद्राबाद यांचे प्रवचन व सायंकाळी ६.३0 वाजता सायंउपासना व पंचपदी होईल. १९ व २0 जुलै रोजीदेखील काकाड आरतीसह पहिल्या दिवसाप्रमाणे कार्यक्रम होतील. शिबिराची सांगता २0 जुलै रोजी दुपारी ४ वाजता प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख, अमरावती यांच्या उपस्थितीत होईल. कार्यक्रमाला येणार्या भाविकांची व्यवस्था संस्थानच्यावतीने करण्यात आली आहे, असे सुरेश गावपांडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला रामदासपंत देव, श्रीराम गदादरशास्त्री, संजय सकळकळे, सुरेश जोशी, प्रभू देशपांडे, डॉ. अजय मुळे, नंदकिशोर शंकरपुरे, माणिक जोशी, रितेश खोत, अमित मुंजे, डॉ. माधव देशमुख आदी उपस्थित होते.
अकोल्यात नामजप शिबिर
By admin | Published: July 02, 2014 12:25 AM