बुलडाणा : वृद्ध कलावंत मानधन योजनेंतर्गत जिल्ह्यातील वृद्ध कलावंताना दिल्या जाणार्या मानधन योजनेच्या यादीत मृत कलावंतांची नावेही समाविष्ट असल्यामुळे, त्यांच्या नावावर दरवर्षी लाखो रू पयांचे मानधन मंजूर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत पात्र वृद्ध कलावंतांना दरमहा १ हजार, १२00 आणि १४00 रूपयापर्यंत वेगवेगळय़ा श्रेणीत मानधन दिले जाते. बुलडाणा जिल्ह्यात मानधनास पात्र ठरलेले असे ७२१ वृद्ध कलावंत आहेत. त्यांना सहा महिन्यांच्या मानधनाची एकत्रित रक्कम दिली जा ते. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने पात्र केलेल्या कलावंताना मानधनाचे वाटप संबंधित पंचायत समितीमार्फत होते. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या पात्र लाभा र्थ्यांच्या यादीतील ७२१ कलावंतांना २९ मार्च रोजीच्या आदेशान्वये ६0 लाख ६ हजार ३00 रुपये मंजुर झाले होते. विशेष म्हणजे मंजुर यादीतील बुलडाणा, मोताळा, मलकापूर, चिखली, शेगाव, नांदुरा आणि शेगाव तालुक्यातील १४ कलावंतांचा अगोदरच मृत्यू झालेला असतानाही, मंजूर यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. दरवर्षी त्यांच्या नावावर अंदाजे १ लाख ६८ हजार रुपये मंजुर होतात. हे कलावंत किंवा त्यांचे वारस हयात नसताना त्यांची नावे यादीत कशी आणि त्यांच्या नावावर मंजूर झालेले मानधन जाते कोठे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस् िथत होत आहे
. ** मृतकांची नावे काढलीच नाही
वृद्ध कलावंतांना मानधन मंजुर झाल्यानंतर दरवर्षी त्यांच्याकडून हयातीचे प्रमाणत्र घेणे बंधनकारक आहे. पंचायत समितीने हे हयातीचे प्रमाणपत्र समाज कल्याण विभागाकडे सादर झाल्यानंतर समाज कल्याण विभाग मानधन मंजरीसाठी प्रस्ताव पाठविते. त्यानुसार नव्याने मानधन मंजूर होते. लाभार्थी कलावंताचे निधन झाले असल्यास, वारस पत्नीला लाभ मिळतो; मात्र वारसाचा मृत्यू झाल्यानंतर लाभ खंडित केला जातो. म्हणूनच हयातीचे प्रमाणपत्र दरवर्षी सादर करणे बंधनकारक असते; मात्र गत अनेक वर्षापासून मानधनास पात्र कलावंतांचे हयातीचे प्रमाणपत्रच जोडले नसल्याने, मृत्यूनंतर काहींची नावे चार-पाच वर्षापासून यादीत तशीच आहेत.