आलेगाव(अकोला) : शासनाकडून कर्ज माफ झालेले असतानाही पीक कर्ज माफ करून देण्याच्या नावाखाली गावंडगाव येथील शेतकऱ्याची मळसूर येथील गट सचिवाने एका खासगी व्यक्तीच्या मदतीने १ लाख २० हजार रुपयांनी फसवणूक केली. यासंदर्भात शेतकऱ्याने ऑगस्ट महिन्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी चौकशीअंती रविवारी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत कोणालाही अटक केली नाही.
गावंडगाव येथील शेतकरी केशव भालचंद्र राठोड (६०) यांचे पीक कर्ज शासनाने अगोदरच माफ केलेले असतानाही गट सचिव अजित विश्वंभर काळे याने एक खासगी व्यक्ती उत्तम बंडूजी धाईत याच्या मदतीने केशव राठोड यांची दिशाभूल केली. तुमचे पीक कर्ज माफ झालेले नाही, त्याचे पुनर्गठन करून देतो, असे सांगून अजित काळे याने केशव राठोड यांच्याकडे एटीएम आणि विड्रॉल स्लिपची मागणी केली. त्यांच्यावर विश्वास ठेवून केशव राठोड यांनी आलेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आपले एटीएम कार्ड आणि त्याचा पासवर्ड दिला. विड्रॉल स्लिपही दिली. राठोड यांच्या अज्ञानाचा फायदा घेत काळे आणि धाईत यांनी संगनमताने त्यांची फसवणूक करीत राठोड यांच्या खात्यातील तब्बल १ लाख २० हजार रुपये दुसºयाच्या खात्यात वळते केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राठोड यांनी चान्नी पोलिसांत धाव घेऊन काळे आणि धाईत यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यावरून आरोपींच्या विरोधात कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, एकीकडे नापिकी, दुष्काळाची परिस्थिती आणि पावसाअभावी शेतकरी वर्ग हवालदिल झालेला असताना दुसरीकडे त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत काळे आणि धाईत यांच्यासारखे लोक गरीब शेतकºयांची फसवणूक आणि लुबाडणूक करीत आहेत. अशा अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
गावंडगाव येथील शेतकरी केशव राठोड यांनी ऑगस्ट महिन्यात चान्नी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश झोडगे, ठाणेदार चान्नी.