अकोला: महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री तथा काँग्रेसचे नेते डाॅ. नितीन राऊत हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ॲड. प्रकाश आंबेडकर घराण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. त्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेत्यांनी त्यांचे मानसिक संतुलन बिघडले, अशी टीका करत अकाेल्यातील प्रख्यात मानसाेपचारतज्ज्ञांकडे तपासणीसाठी नाेंद करत ती पावती व्हायरल केली.
नितीन राऊत हे दाेन दिवसांसाठी वऱ्हाडच्या दाैऱ्यावर आहेत, साेमवारी अकाेल्यातील कार्यक्रम संपवून ते मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यात रवाना झाले त्यावेळी बाेलतांना ते आंबेडकर घराणेशाहीवर घसरले, आंबेडकर हे भाजपाला सहकार्य करतात असा आराेपही त्यांनी केला. या वक्तव्याचा निषेध करताना त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगत थेट त्यांच्या उपचारासाठी अकोल्यातील मानसोपचारतज्ज्ञांकडे त्यांच्या नावाची नोंद केली. एवढेच नाही तर त्यांच्या उपचारासाठी प्रत्येकी १० पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू करू असा टाेला लगावतानाच घराणेशाहीबद्दल बोलताना राऊत यांना काँग्रेसच्या घराणेशाहीचा विसर कसा पडला?, असा सवाल वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून उपस्थित केला आहे.
उपचारासाठी पैसे कमी पडू देणार नाही!
अकोल्यात वंचितच्या एका कार्यकर्त्याने थेट शहरातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांच्या रुग्णालयात मानसोपचार करण्यासाठी ओपीडीमध्ये नोंद करून आपला रोष व्यक्त केला आहे. रुग्णालयात पावती क्रमांक ७३४५ नुसार नितीन राऊत नागपूर यांचे उपचाराकरिता २०० रुपयांचे शुल्क वंचितचे कार्यकर्ते सचिन शिराळे यांनी दिले आहे.