अकोला : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कठाेर निर्बंध लागू केले आहेत; मात्र प्रत्यक्षात या नियमांचे पालन हाेताना दिसत नाही. दुसरीकडे संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने कोरोना चाचणी करून घेणाऱ्यांची संख्या वाढली असून, शहरातील सर्वच चाचणी केंद्रांवर संदिग्ध रुग्णांची गर्दी होत आहे. चाचणी केंद्रांवर रांगा लागत असल्याने या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडत आहे.
गतवर्षी डिसेंबर महिन्यात उतरणीला लागलेला कोरोनाचा आलेख या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा वरच्या दिशेने आगेकूच करीत आहे. शासनमान्य करीत नसले, तरी समूह संसर्ग सदृशस्थिती निर्माण झाली असून, बाधित होणाऱ्यांची दैनंदिन आकडेवारी जुने विक्रम मोडत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हाय रिस्क संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. तसेच निर्बंधही लादले आहेत, या नियमांचे पालन हाेताना दिसत नाही. चित्रपटगृह बंदच आहेत. त्यामुळे तेथे ५० टक्के क्षमतेचा प्रश्नच नाही; शाळा महाविद्यालये बंद आहेत.
चाचणी केंद्र
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयएमए हॉल, महापालिकेच्या रुग्णालयात विविध तपासणी केंद्रांवर चाचणीसाठी रांगा लागत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याकडे दुर्लक्ष होत आहे. चाचणी केल्यानंतर अहवाल मिळविण्यासाठी कक्षासमोरही दररोजच मोठी रांग लागलेली असते.
विवाह संभारंभ
विवाह समारंभामध्ये केवळ २५ वऱ्हाडीच उपस्थित राहू शकतील असा दंडक आहे. प्रत्यक्षात मात्र विवाह समारंभात पंगती उठताना दिसतात.. काहींनी तर वऱ्हाड्यांना उपस्थितीसाठी वेगवेगळ्या वेळा देऊन नियमांमधून पळवाट शाेधल्याचे चित्र आहे.
अंत्यविधी
केवळ काेराेनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर अंत्यविधीसाठी परिवारातील सदस्यच उपस्थित राहत आहेत. इतर ठिकाणी अंत्यविधीसाठी उपस्थिती काही प्रमाणात घटली असली तरी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांपेक्षा जास्तच उपस्थिती दिसून येते.
कार्यालय
सरकारी किंवा खासगी आस्थापनांमध्ये ५० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. मात्र अनेक ठिकाणी सर्वच कर्मचारी काम करताना दिसतात. काही विभागांत रिक्त पदांची संख्या माेठी असल्याने ५० टक्क्यांचा नियम अडचणीचा ठरत असल्याचे म्हणणे आहे.
गृह विलगीकरण
गृह विलगीकरण रुग्णांच्या घरावर फलक लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला हाेता. मात्र एकाही रुग्णाच्या घरावर असा फलक लावण्यात आलेला नाही. पूर्वी रुग्णाच्या घरासमाेर बॅरिकेड लावले जात हाेते, तेसुद्धा आता लावले जात नाहीत.
३०१४ जणांकडून; ६.३९ लाखांचा दंड वसूल !
कोरोना प्रतिबंधक नियमांंचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील तीन हजार १४ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. २२ फेब्रुवारी ते १४ मार्च या २१ दिवसांच्या कालावधीत करण्यात आलेल्या या कारवाईत सहा लाख ३९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.