अकोला, दि. २0- स्पर्धा परीक्षा आणि दहावी, बारावीच्या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी अभ्यासिका सुरू केल्या आहेत. पण या अभ्यासिकांच्या नावाखाली विद्यार्थ्यांची सर्रास लूट केली जात असल्याचे चित्र असून, इमारतींना व्यावसायिकतेचे स्वरूप देणार्यांवर कोणाचे नियंत्रण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात अनेक ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांचे पीक आले आहे. हजारो विद्यार्थी या मार्गदर्शन केंद्रांमध्ये विविध पदांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. या केंद्र संचालकांनी स्वत:चेच भलेमोठे ग्रंथालय उघडून विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली. अभ्यासक्रम शुल्कासह विद्यार्थ्यांकडून अभ्यासिका आणि ग्रंथालयाचे सुद्धा हजारो रुपये शुल्क वसूल केले जात आहे. शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना अभ्यासिकेमध्ये प्रवेश दिला जात नाही. तसेच सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थी निवांत वातावरण शोधत असल्याने, अभ्यासिका संचालकांमार्फत विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थीही अभ्यासिकांकडे आकर्षित होऊन दहा ते पंधरा दिवसांसाठी अभ्यासिकांमध्ये प्रवेश घेत आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासिकांकडे वाढता कल पाहता, अनेक इमारत मालकांनी आपल्या येथे व्यावसायिक तत्त्वावर अभ्यासिका सुरू केल्या आहेत. सद्यस्थितीत शहरामध्ये २६ अभ्यासिका सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, अभ्यासिका सुरू करण्यार्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र संचालक आणि शिकवणी वर्ग संचालकांसोबत करारसुद्धा केले आहेत. त्यामुळे शिकवणी वर्ग संचालकांकडूनसुद्धा विद्यार्थ्यांनी अमुक ठिकाणीच अभ्यासिका लावण्याचे सांगण्यात येते. त्यासाठी विद्यार्थ्यांंकडून हजारो रुपये शुल्क आकारण्यात येते. अभ्यासिकांच्या नावाखाली सुरू असलेल्या या लुटीवर शिक्षण विभागासह महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासनाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे अभ्यासिका सुरू करून त्याला व्यावसायिक स्वरूप देणार्यांकडून मनमानीपद्धतीने शुल्क घेतले जात आहे. महापालिकेचे प्रमाणपत्रही नाही!कोणत्याही इमारतीचा व्यावसायिक उपयोग करायचा असल्यास, त्यासाठी परवाना घ्यावा लागतो; परंतु अभ्यासिका संचालकांनी मनपाकडूनही प्रमाणपत्र घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे. एकाही संचालकाने महापालिकेकडे तशी नोंद केली नसल्याची माहिती पुढे आली आहे. यावरून अभ्यासिका चालविणारे संचालक महापालिकेचे उत्पन्न बुडवित आहेत.अभ्यासिकांना शिक्षण विभागाची परवानगी नाही!अभ्यासिकांच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट सुरू असून, याकडे माध्यमिक शिक्षण विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. अभ्यासिका सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक असतानाही शहरातील एकाही अभ्यासिकेला शिक्षण विभागाने परवानगी दिलेली नाही किंवा तसा अर्जही आतापर्यंंत कोणी केलेला नाही. असे असतानाही अभ्यासिका सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई अपेक्षित असताना, शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे.
अभ्यासिकांच्या नावाखाली विद्यार्थ्यांची सर्रास लूट!
By admin | Published: March 21, 2017 2:45 AM