भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्र प्राप्त करून ते मतदार यादीत अंतर्भूत करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने जिल्हयातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) डिसेंबर २०१९ ते मार्च २०२१ या कालावधीत मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या घरी भेटी दिल्या. त्यावेळी मतदार याद्यांमध्ये छायाचित्र नसलेल्यांपैकी काही मतदार मतदार यादीत नमूद असलेल्या निवासी पत्त्यावर कायमस्वरूपी राहत नसल्याचे निदर्शनास आले. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्यांपैकी जे मतदार मतदार यादीत नमूद निवासी पत्त्यायावर राहत नसल्याचे आढळून येत असल्यास, लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी अधिनियम १९६० मधील तरतूद व भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येते. त्यानुषंगाने मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या जिल्ह्यातील ६८ हजार ८२८ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यासंदर्भात आक्षेप व हरकती असल्यास ५ जूनपर्यंत नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध!
मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात नागरिकांना पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ही यादी अकोला जिल्ह्याच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार
यादीत छायाचित्र नसलेले मतदार!
मतदारसंघ मतदार
अकोट ७,२६१
बाळापूर ५,१४७
अकोला पश्चिम २४,२१४
अकोला पूर्व १६,२०७
मूर्तिजापूर १५,९९७
........................................................
एकूण ६८,८२६