अतुल जयस्वाल, अकोला: प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत दक्षिण मध्य रेल्वेनेअकोला-वाशिममार्गे धावणारी नांदेड-एलटीटी विशेष एक्स्प्रेस नियमित करण्यास नकार दिला असून, आता या गाडीच्या विशेष फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. ही गाडी कायमस्वरूपी रद्द होताच हिंगोली, नांदेड, वाशिम, अकोला आदी जिल्ह्यांतून संताप व्यक्त होत आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने १७६६५/६६/६७/६८ नांदेड-एलटीटी वाशिम-अकोला मार्गे सुरु केली. सुरवातीला काही दिवस ही गाडी योग्य वेळेवर धावत होती. गाडीला मिळणारा प्रतिसाद पाहता रेल्वे बोर्डाने २९ ऑगस्ट रोजी एक पत्र जारी करून ही गाडी नवीन क्रमांक देऊन नियमित करण्याची घोषणा केली. रेल्वे बोर्डाने पत्र देऊन तीन महिने उलटले तरी दक्षीण मध्य रेल्वेने ही गाडी नियमित तर केली नाहीच, उलट धावणाऱ्या विशेष फेऱ्याही बंद केल्या.
म्हणे, व्यावयासिकदृष्टा परवडणारे नाही
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी दक्षिण मध्य रेल्वेला पत्र लिहून नांदेड-एलटीटी गाडी कायम करण्याची मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना दक्षीण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. जैन यांनी १६ नोव्हेंबर रोजी एक पत्र जारी करत या गाडीला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने ती नियमित करणे व्यावसायिकदृष्ट्या परवडणारे व योग्य नसल्याचे म्हटले आहे.
गैरसोईचे वेळापत्रक
या गाडीचे वेळापत्रक गैरसोयीचे आहे. ही गाडी नांदेडहून रात्री ९ वाजता सुटते, १२ वाजता हिंगोली, १:३० वाजता वाशिम, ३:३० वाजता अकोला पोहोचते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता कुर्ल्याला पोहोचते. विशेष गाडी असल्याने इतर गाड्यांना वाट मोकळी करून देण्यात उशीर झाल्यामुळे मुंबईला पोहोचण्यासही उशीर होऊ लागला आणि त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
१४०० किमी दूर असलेल्या देशाच्या राजधानी करता वाशिम-हिंगोली मार्गे रेल्वे आहे, मात्र ७०० किमी दूर राज्याच्या राजधानी करता रेल्वे नसने ही शोकांतीका आहे. अत्यंत गैरसोयीचे वेळापत्रक व रॅक शेअरिंगमुळे ट्रेनचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. ही गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवासी, रेल्वे सल्लागार सदस्य व रेल्वे संघटनांनी रेल्वे मंत्रालय व दक्षिण मध्य रेल्वेकडे केली आहे.- ॲड. अमोल इंगळे, रेल्वे प्रवासी संघटना, अकोला